रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला, राहुल गांधी यांच्या विधानाबाबत चर्चेची शक्यता…
रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला...
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) हे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होतेय. भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानानंतर होणारी ही भेट महत्वपूर्ण आहे.
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत विधान केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांनीही भारत जोडो यात्रेत जात राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर होणारी रणजीत सावरकर आणि राज ठाकरे ही भेट महत्वपूर्ण आहे.
राहुल गांधी यांचं विधान काय?
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.
राहुल गांधी हे सध्या भारत जोडोसाठी निघालेत. पण त्यांच्या विधानाने महाराष्ट्रात तेढ निर्माण झालाय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा, अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केलीय.