शरद पवार, रामराजे यांच्या समोर हरलो नाही, आंडू पांडूनी नाद करु नये : रणजीतसिंह नाईक निंबाळकर
शरद पवार (Sharad Pawar) आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समोर मी हरलो नाही तर मग इतर आंडू पांडूनी माझा नाद करू नये, असं वक्तव्य खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलंय.
सातारा : शरद पवार (Sharad Pawar) आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समोर मी हरलो नाही तर मग इतर आंडू पांडूनी माझा नाद करू नये, असं वक्तव्य खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलंय. फलटण येथे झालेल्या शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाच्या समारोप समारंभामध्ये माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar ) यांनी फलटणचे उद्योजक दिगंबर आगवणे (Digambar Agawane) यांच्यावर टीका केली आहे.आगवणे यांनी खासदारांनी फसवणूक केल्याच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. मला आणि जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. लाखो लोकांनी मला निवडून दिलंय, दोन पिढ्यांचा संघर्ष करुन इथपर्यंत आलो, असल्याचं रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणालेत.
रणजीतसिंह नाईक निंबाळकर काय म्हणाले?
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार मला आणि आमदार जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नसून दोन पिढ्या संघर्ष करून आलेलो आहे. जो माणूस शरद पवार आणि श्रीमंत रामराजे यांच्या पुढे हरलो नाही मग या ठिकाणच्या आंडू पांडूनी माझा नाद करू नये, असा टोला दिगंबर आगवणे यांना खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना भाषणात लगावला आहे.
जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका
रामराजे नाईक निंबाळकर यांनी 800 कोटी किती शून्य असतात हे सांगावं, अशी टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे. दुष्काळी भागाला मिळालेल्या निधीवरून आमदार जयकुमार गोरे यांनी ही टीका केली आहे.आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली तेव्हा सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी 800 कोटींचा निधी बाबत चर्चा केली होती. त्यावेळी कोणताही विचार न करता त्यांनी तात्काळ निधी मंजूर केला. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी पंतप्रधानांचे कौतुक करत श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. रामराजेंनी 800 कोटीत शून्य किती असतात हे सांगावं असं जयकुमार गोरे आपल्या भाषणात म्हणाले.