…तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात, राष्ट्रवादीपाठोपाठ दानवेंनीही मनातील भावना बोलून दाखवली
अजित पवार आणि मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीपाठोपाठ दानवेंनीही मनातील भावना बोलून दाखवली.
जालना : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावेत अशी अनेकांची इच्छा आहे. राजकीय नेत्यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलूनही दाखवली.काल दिवाळी पाडवा होता. त्यानिमित्त शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे भेटीचा कार्यक्रम होता. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबतची इच्छा बोलून दाखवली.अजितदादा आणि मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनीही आपलं मत मांडलंय.
दानवे काय म्हणाले?
आपल्या देशात लोकशाही आहे.राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली. त्यांच्याकडे बहुमत आलं. तर निश्चितपणे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असं दानवे म्हणालेत.
अजित पवार आणि मुख्यमंत्रीपद
अजित पवार राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. जितकं झपाटून काम करतात तितकंच रोखठोक बोलतात. काम होणार असेल तर त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्याची तयारी ठेवतात. पण जर काम होणार नसेल तर स्पष्ट नकार देतात, ही त्यांची ख्याती आहे. पण मुख्यमंत्रीपदाने त्यांना कायम हुलकावणी दिली आहे. आतापर्यंत त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावं लागलंय. ते चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत. पण आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे.
रोहित पवार यांनीही अजित पवारांच्या भविष्यबाबत मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीचा एखादा नेता मुख्यमंत्री होत असेल चांगली गोष्ट आहे. दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेल्यास राज्याला, पार्टीला त्याचा फायदा राहिल, असं रोहित पवार म्हणालेत.