विधानसभेची आचारसंहिता 13 तारखेला लागणार : रावसाहेब दानवे
येत्या 13 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जालन्यात ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात जाहीर करुन टाकलं
जालना : विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक कधी जाहीर होणार, याचा अंदाज बांधण्यात भाजप नेत्यांची चढाओढ लागलेली दिसत आहे. येत्या 13 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता (Assembly Election Code of Conduct) लागणार आहे, असं भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जाहीर करुन टाकलं. जालन्यात ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात संवाद साधताना दानवेंनी ही माहिती दिली.
येत्या 13 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, असं दानवे म्हणाले. बारा दिवस बाकी आहेत. तोपर्यंत आमची यात्रा (महाजनादेश यात्रा) चालणार आहे. यात्रा एकदा संपू द्या, तुमच्या मागण्या एकदा कागदावर आणा. जालन्यात बैठक घ्या, आम्हाला बोलवा आणि मागण्या समजावून सांगा. नाराज होऊ नका, असं दानवे कार्यकर्त्यांना म्हणाले. राजकारणातही मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
अनंतचतुर्दशी 12 सप्टेंबरला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 12 तारखेला आचारसंहिता लागणार असून 15 ऑक्टोबरला मतदान असेल, असं दोनच दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
मुख्यमंत्रिपदाबाबत पुढच्या काळात विचार करु
‘मुख्यमंत्री व्हा मुख्यमंत्री’ अशी मागणी जालन्यात आयोजित सभेच्या वेळी एका कार्यकर्त्याने दानवेंकडे केली. ही मागणी ऐकताच रावसाहेब दानवेंची कळी खुलली आणि ‘हे बघा… याला म्हणतात माणूस, एक समर्थक निघाला आपला’ अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली. ‘अरे मुख्यमंत्री आपलाच आहे ना. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आपलेच होते’ अशी पुष्टीही दानवेंनी जोडली.
‘तुम्ही व्हा तुम्ही’ असा गलका कार्यकर्त्यांनी केला. त्यातच ‘जालन्याचा पाहिजे’ अशी मागणी कोणीतरी केली. त्यावर मुख्यमंत्रिपदाबाबत पुढच्या काळात विचार करु, अशी सावध प्रतिक्रिया दानवेंनी दिली. आपले मुख्यमंत्री सक्षम आहेत, असंही रावसाहेब दानवे पुढे म्हणाले.