दानवेंनी रुग्णालयात मुक्काम ठोकला, युती धर्म मोडून जावयाला मदत केली : खैरे
औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये युती धर्म पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढवत होते. दानवेंनी युती धर्म मोडत जावयाला मदत केली असं म्हणत खैरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह […]
औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये युती धर्म पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढवत होते. दानवेंनी युती धर्म मोडत जावयाला मदत केली असं म्हणत खैरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे.
चंद्रकांत खैरेंनी उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले असून, संघानेही दखल घेतली असल्याचं बोललं जातंय. बहुजन वंचित आघाडीचे इम्तियाज जलील खैरे यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मानले जात होते. पण हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे खैरे यांना हमखास मिळणारी मराठा मते फुटली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा दावा खैरेंनी केलाय.
“दानवेंचा उपचाराच्या निमित्ताने रुग्णालयात मुक्काम”
दानवेंनी जावयाला आवरलं नाही, असं खैरेंनी म्हटलंय. दानवेंविरुद्ध जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पण उद्धव ठाकरे आणि खैरे यांनी खोतकर यांची समजूत काढली आणि खोतकरांनीही दानवेंचा प्रचार केला. ‘दानवेंनी प्रचाराच्या काळातच औरंगाबादच्या रुग्णालयात उपचाराच्या निमित्ताने पाच-सहा दिवस मुक्काम केला आणि राजकीय भेटीगाठी घेत जावयाला मदत केली. दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादच्या भाजपच्या 8 ते 10 नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचं उघडपणे काम केलं. जाधव यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. दानवे आणि त्यांचे जावई जाधव यांना आवरा’ अशी तक्रार खैरे यांनी अमित शाह यांना भेटून केली. त्यावर शाह यांनी आपल्याला निश्चिंत राहण्याचे आश्वासन दिल्याचे खैरे यांनी सांगितलंय.
महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. औरंगाबादसह 14 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान झालं. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. पण त्यापूर्वी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.