एकट्या फडणवीसांमुळं पक्ष चालत नाही, भाजपमध्ये कुठलाही निर्णय सामूहिकरित्या- दानवे
एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत भाजपला राम-राम ठोकला. त्यानंतर भाजपमध्ये एकाधिकारीशाही सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हे एकटेच पक्ष चालवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्या आरोपांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: ‘भाजपमध्ये कुठलाही एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. भाजपमध्ये सामूहिकरित्या निर्णय घेण्याची पद्धत आहे. त्यामुळं एकट्या देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष चालत नाही’, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिलं. भाजपला राम-राम ठोकताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. सध्या भाजपमध्ये एकाधिकारशाही सुरु आहे आणि एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर रावसाहेब दानवे यांनी खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांच्या आरोपानंतर राज्य भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांची एकाधिकारशाही सुरु असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरु आहे. त्या आरोपांना दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं. (Raosaheb Danve on Eknath Khadse NCP entry and Devendra fadnavis)
‘भाजपमध्ये मी नाथाभाऊंपेक्षा सीनियर आहे. त्यामुळं आम्हा सर्वांना एकमेकांची वाटचाल माहिती आहे. मी प्रदेशाध्यक्ष असताना काही गोष्टी फडणवीसांना मान्य नव्हत्या. पण मी त्यांना पटवून दिल्या आणि त्यांना त्या गोष्टी मान्य कराव्या लागल्या. त्यामुळे राज्यात एकटे फडणवीस पक्ष चालवतात हा आरोप आपल्याला मान्य नाही’, रावसाहेब दानवे यांनी आवर्जुन सांगितलं. भाजपमध्ये एक ठरलेली प्रक्रिया आहे. भाजपमध्ये कुणीही एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. पक्षात सामूहिकरित्याच निर्णय होतात. तसंच कुणावरही निर्णय लादला जात नाही, असं दानवे टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.
खडसेंची मुख्यमंत्रीपदाची संधी का हुकली?
‘एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्याकडे राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी अशी राज्यासह केंद्रीय नेतृत्वाची इच्छा होती. पण नाथाभाऊ यांनी तब्येतीचं कारण देत प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा भाजपमध्ये एकट्या नाथाभाऊंकडे लाल दिव्याची गाडी होती. त्यावेळी खडसे यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं असतं तर कदाचित पुढे ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरले असते, असं असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.
जळगावात भाजप मजबूत, पण नाथाभाऊ गेल्याचं दु:ख- दानवे
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय दुर्दैवी आहे. पण जळगावमध्ये भाजप पक्ष मजबूत आहे. त्यामुळं नाथाभाऊ राष्ट्रवादीत गेल्यामुळं जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसेल, या शक्यतेला कुठलाही आधार नसल्याचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
संबंधित बातम्या:
Eknath Khadse | एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत, शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
अंजली दमानिया यांच्या आरोपांवर उद्याच उत्तर देणार: एकनाथ खडसे
…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यावं लागलं : एकनाथ खडसे
Raosaheb Danve on Eknath Khadse NCP entry and Devendra fadnavis