युती करताना जे ठरलं, त्याचप्रमाणे निर्णय होईल : रावसाहेब दानवे
येत्या 30 ऑक्टोबरला अमित शाह मुंबईला येणार असून ते पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतील, त्यानंतर ते नेत्यांची निवड करतील, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं (Raosaheb Danve). तसेच, नेत्यांच्या निवडीनंतर भाजप आणि शिवसेना पक्षाचे नेते एकत्र बसून युती करताना जे ठरलं आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतील, असंही दानवेंनी म्हटलं
जालना : देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह महाराष्ट्रातील मंत्रीपदाबाबत निर्णय घेणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं (Amit Shah). येत्या 30 ऑक्टोबरला अमित शाह मुंबईला येणार असून ते पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतील, त्यानंतर ते नेत्यांची निवड करतील, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं (Raosaheb Danve). तसेच, नेत्यांच्या निवडीनंतर भाजप आणि शिवसेना पक्षाचे नेते एकत्र बसून युती करताना जे ठरलं आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतील, असंही दानवेंनी म्हटलं (Shivsena BJP Alliance).
राज्यात शिवसेना आणि भाजपचं सरकार असेल, असा दावा दानवेंनी यावेळी केला. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची लोकसभेवेळी जी चर्चा झाली, ती त्या दोघांनाच माहिती आहे. त्यामुळे मी अधिकृतरित्या काही सांगू शकत नाही. ते त्यांनाच विचारलेलं बरं, पण सरकार मात्र युतीचे राहील, असा ठाम विश्वास दानवेंनी ‘टीव्ही-9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर कोणते मंत्री घ्यायचे आणि किती मंत्री घ्यायचे, हा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना असेल, असेही दानवेंनी स्पष्ट केलं.
बबनराव लोणीकर पुन्हा मंत्री होणार : रावसाहेब दानवे
बबनराव लोणीकर हे राज्य सरकारमध्ये पुन्हा मंत्री होणार, असं भाकीत रावसाहेव दानवे यांनी वर्तवलं. जालन्यातील अखिल भारतीय युवा मंच आणि अखिल भारतीय मारवाडी संमेलनात दानवेंनी हे भाकीत केलं. तसेच, मी आजच सांगत आहे, राज्य सरकारमध्ये तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त काम करा, परतूरपेक्षा जास्त लक्ष जालन्यात घाला, अशा सूचना त्यांनी लोणीकरांना केल्या.
भाजप-शिवसेना भाजपमध्ये मंत्रीपदावरुन रस्सीखेच
राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यापासून राज्यातील राजकारणाचं चित्रच पालटलं आहे. जिथे निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेना लहान भाऊ-मोठा भाऊ वाटतं होते, त्यांच्यातच आता सत्तास्थापनेवरुन खटके उडू लागले आहेत. एकीकडे शिवसेना 50-50 चा फॉर्म्युला आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावरुन अडून बसली आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील असं भाजपचे नेते सांगत आहेत. त्यामुळे युतीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
आता अमित शाह युतीचा हा पेच कसा सोडवणार, मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं, कुणाला मंत्री करायचं, शिवसेनेशी कसं जुळवून ठेवायचं, असे अनेक प्रश्न सध्या भाजपसमोर आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील राजकारणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.