गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, रावसाहेब दानवेंचे टोले, मंत्री अब्दुल सत्तारांना ओपन चॅलेंज
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघातील सत्कार सोहळ्यात जोरदार बॅटिंग केली. सिल्लोडमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यात रावसाहेब दानवेंनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना टोले लगावले.
औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मतदारसंघातील सत्कार सोहळ्यात जोरदार बॅटिंग केली. सिल्लोडमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यात रावसाहेब दानवेंनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना टोले लगावले. मतदारसंघात सध्या बाबर शिरला आहे. तो नागरिकांना आमिष दाखवत आहे, असं रावसाहेब दानवे सत्तारांना उद्देशून म्हणाले. अब्दुल सत्तार खूप झालं, 50 कोटी रुपये आणील, मात्र आपण एकच रस्ता 2400 कोटींचा केला. अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, मग बघू कोण हरतं ते, असं आव्हानही दानवेंनी दिलं.
चिरीमिरीचं नाही खेळावं. गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, शिवसेनेची शाखा काढत बसतं. मात्र या शिवसेनेच्या शाखा नाहीत, या सत्तारच्या शाखा आहेत. सत्तारला माझं चॅलेंज आहे सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा, मी पाठीशी आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवे औरंगाबादत
दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपादाचा भार स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच 17 ऑगस्ट रोजी औरंगाबादेत दाखल झाले. मी आज पहिल्यांदा रेल्वे मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यात आलो, माझ्या कार्यकर्त्यांना आनंद झाला त्यांनी माझा सत्कार केला, मी कार्यकर्त्यांच्या बळावर मी इथपर्यंत पोचलो, मलाही आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली होती.
मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता, जिथे इंग्रज होते तिथे रेल्वेचं जाळ तयार झालं, मराठवाड्यातल्या रेल्वेचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर मुंबई हा सर्वाधिक वापरला जाऊ शकणार रेल्वे मार्ग बनू शकतो, तो बुलेट ट्रेन मार्ग जर तयार झाला तर मुंबईहून औरंगाबादला दीड तासात आणि नागपूरला 3 तासात आपण पोहोचू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम ते होऊ शकतं, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.