उद्धव ठाकरेंकडे सरकारची, तर रश्मी वहिनींकडे शिवसेनेची सूत्रं, उर्मिलाच्या प्रवेशानंतर पुन्हा अधोरेखित
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि शिवसेनेसारख्या मोठ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत.
मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची सूत्र उद्धव ठाकरेंकडे, तर शिवसेनेची सूत्र रश्मी ठाकरेंकडे असल्याची चर्चा आहे. (Rashmi Thackeray reportedly leading Shivsena while Uddhav Thackeray leads Maha Vikas Aghadi Government)
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेसारख्या मोठ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत. त्यातच कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्र्यांवर अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे त्यांच्या बेटर हाफ रश्मी ठाकरे यांनी पक्षनेतृत्वाचा भार काहीसा हलका केल्याचे दिसते. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश केला. त्यातून मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार चालवत आहेत, तर शिवसेनेची सूत्रे रश्मी ठाकरेकडे आली आहेत, ही गोष्ट अधोरेखित झाल्याची चर्चा आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची मार्च महिन्यात निवड करण्यात आली. रश्मी ठाकरे यांच्या नियुक्तीसह त्यांना ‘सामना’च्या पहिल्या महिला संपादक होण्याचा सन्मान मिळाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती. रश्मी ठाकरे यांच्या निवडीनंतर या पदावर ठाकरे कुटुंबातीलच व्यक्ती असणार हे स्पष्ट झालं.
रश्मी ठाकरे यांच्या स्वभावातील साधेपणाचं कौतुक अनेक राजकीय नेत्यांपासून शिवसैनिक करताना दिसतात. मुख्यमंत्री पती, पर्यावरण मंत्री मुलगा यांच्या जोडीने वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्राची वेगळी वाट चोखंदळणाऱ्या दुसऱ्या मुलासह शिवसेनेच्या परिवाराला त्यांनी जोडून ठेवलं आहे.
शिवसेनेची राजकीय भूमिका ठरवण्यामागे रश्मी ठाकरे यांची पडद्याआड महत्वाची भूमिका राहिल्याची राजकारणात दबक्या आवाजात चर्चा होत असते. शिवसेना-भाजप युतीचं घोंगडं भिजत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला एक किस्सा चांगलाच गाजतो. ‘मातोश्री’वर आम्ही गेलो, रश्मी वहिनींच्या हातची साबुदाणा खिचडी आणि वडे खाल्ले आणि युतीचा निर्णय झाला, असे त्यांनी हसत-हसत सांगितले होते. त्यामुळे रश्मी ठाकरे यांना पडद्याआड राहून काम करणं पसंत असल्याचं दिसतं.
रश्मी ठाकरे यांच्याकडे कोणकोणत्या जबाबदारी ?
- दैनिक सामनाच्या संपादक
- शिवसेनेच्या संलग्न संघटनाच्या अध्यक्ष
- मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष
- मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष
- (Rashmi Thackeray reportedly leading Shivsena while Uddhav Thackeray leads Maha Vikas Aghadi Government)
उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील; आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छाhttps://t.co/WB0w9GOCsI#UrmilaMatondkar #aadityathackeray #shivsena #Maharashtra @UrmilaMatondkar @AUThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या :
भगवा मास्क, रश्मी ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन, उर्मिला मातोंडकर यांचा ‘मातोश्री’वर शिवसेना प्रवेश
(Rashmi Thackeray reportedly leading Shivsena while Uddhav Thackeray leads Maha Vikas Aghadi Government)