रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या 4 आमदारांचं शक्तिप्रदर्शन
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या चार आमदारांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधला.
रत्नागिरी : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या चार आमदारांनी (Ratnagiri Shiv Sena MLA) आज उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधला. (Ratnagiri Shiv Sena MLA) पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दापोली विधानसभा मतदार संघातून रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शक्तिप्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. बैलगाडीत बसून योगेश कदम हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. दापोलीतल्या मैदानावर पहिल्यांदा सभा घेत कदम कुटुंबाने शक्तिप्रदर्शन केलं.
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा सदानंद चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सुद्धा मोठं शक्तिप्रदर्शन केलं.
राजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरुन विरोध झालेल्या राजन साळवी यांनी सुद्धा शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. साळवींनीही राजापुरात आपली ताकद दाखवली.
गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दापोली, गुहागर, राजापूर आणि चिपळूण या सेनेच्या बालेकिल्यातून उमेदवारी अर्ज भरताना सेनेनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
तीन तारखेचाच मुहूर्त पकडून सेनेच्या बालेकिल्यात राजापूर, दापोली, गुहागर आणि चिपळूणमधून सेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागा सेनेकडे गेल्यानं भाजपात नाराजी आहे. मात्र तरी चिपळुणात उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
गुहागर, दापोली आणि राजापुरात भाजपचे पदाधिकारी उमेदवारी अर्ज भरताना दिसून आले नाहीत. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून राहिलंय.