‘संजय राऊतांनी रश्मी ठाकरेंना अश्लील शिव्या घातल्या होत्या’, लवकरच भांडाभोड करणार… रामदास कदम यांचा गंभीर आरोप
संजय राऊत हे मुळात शिवसैनिकच नाहीत, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. संजय राऊत तुम्ही,संपूर्ण देशासाठी आपण महाराष्ट्राला फसवत आहात...असं कदम म्हणाले.
खेड, रत्नागिरी : संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) याच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचं हे कारस्थान आहे. मात्र लवकरच संजय राऊत यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. सामना वृत्तपत्राच्या संपादक पदी रश्मी ठाकरे यांच्या नियुक्ती प्रसंगी संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना अश्लील शिव्या देत होते, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलेले रामदास कदम हे कोकणातील अनुभवी नेते, शिवसेनेतील अनेक वर्षांपासूनच्या घटनांचे साक्षीदार मानले जातात. त्यांनीच असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
रत्नागिरीत खेड येथे पत्रकारांशी बोलताना रामदास कदम यांनी संजय राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांनी आधी काय काय बोललं, यावरून रामदास कदम यांनी सुनावलंय. ते म्हणाले, ‘ ‘सामना’चे संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांच्या पत्नीला अश्लील शिव्या देत होते. सामनाच्या संपादक पदी रश्मी ठाकरे यांच्या नियुक्ती प्रसंगी राऊत शिव्या देत होते. अन् आता स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य ते केवळ प्रसिद्धीसाठी करत आहेत. मी लवकरच त्यांचा भांडाफोड करणार आहे, असं खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय.
‘शिंदेंना बदनाम करण्यासाठी कारस्थान’
एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी तसेच स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी संजय राऊत यांनी हे कारस्थान केलंय, असा आरोप रामदास कदम यांनी केलाय. मी आजपर्यंत त संजय राऊत यांच्यावर कधीच टीका केली नव्हती , मात्र आता डोक्यावरून पाणी जात आहे.. आता यावर बोलावंच लागेल, असं वक्तव्य कदम यांनी केलंय.
संजय राऊत यांनी माझ्यासमोर उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींना अश्लील भाषेत शिव्या घातल्या होत्या, असा पुनरुच्चार रामदास कदम यांनी केला.
‘मुळात शिवसैनिक नाही’
संजय राऊत हे शिवसेनेत राहून राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करतात, असा आरोप नेहमी केला जातो. रामदास कदम यांनी यावरूनच वक्तव्य केलंय. संजय राऊत हे मुळात शिवसैनिकच नाहीत, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. संजय राऊत तुम्ही,संपूर्ण देशासाठी आपण महाराष्ट्राला फसवत आहात…असं कदम म्हणाले.
‘संजयराव भाव ठरवतात’
राज्यातील राजकीय नेत्यांना विकत घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने रेटकार्ड तयार केलंय. तसे एजंट गावोगाव फिरत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यालाच रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ आमदार खासदार आणि नगरसेवकांचे भाव देखील संजयराव ठरवतात. संजय राऊत आता अति झालंय. अति तिथं माती होणार.. आपण कोणाचे काम करतात आपण कुणाचे भक्त आहोत हे आपल्या सर्व माहिती आहे. योग्य वेळी भांडा फोड करणार, असा इशारा रामदाक कदम यांनी दिला आहे.