Ravi Rana : तब्बल 13 दिवसानंतर रवी राणा तुरुंगाबाहेर, घरी जाताना गाडीतही हनुमान चालिसेचं पठण!
हनुमान चालीसा पठणावरून पेटलेला वाद त्यांना जेलवारीपर्यंत घेऊन गेला. त्यानंतर काल नवनीत राणा जेलमधून बाहेर आल्या. तर आज आमदार रवी राणा जेलमधून बाहेर आले. मात्र तब्बल 13 दिवस जेलमध्ये राहून बाहेर पडलेल्या रवी राणांच्या हातात हनुमान चालीसा दिसून आले.
मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) हे गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये होते. हनुमान चालीसा पठणावरून (Hanuman Chalisa) पेटलेला वाद त्यांना जेलवारीपर्यंत घेऊन गेला. त्यानंतर काल नवनीत राणा जेलमधून बाहेर आल्या. तर आज आमदार रवी राणा जेलमधून बाहेर आले. मात्र तब्बल 13 दिवस जेलमध्ये राहून बाहेर पडलेल्या रवी राणांच्या हातात हनुमान चालीसा दिसून आले. घरी जाताना गाडीत रवी राणा हे हनुमान चालीसाचे पठण करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसा आणि मशीदीवरील भोंग्याचा वाद पेटला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदत्व सोडले असल्याचीही टीका वारंवार होत आहे. अशातच हनुमान चालीसाचा मुद्दा पेटल्यावर आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आम्ही उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर म्हणजेच मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार यावरून हा वाद सुरू झाला होता.
नेमका वाद कसा पेटला?
राणांनी ही भूमिका घेल्यानंतर याला शिवसेनेकडून जोरादार विरोध होऊ लागला. नवनीत राणा आणि रवी राणा यांचा उल्लेख बंटी बबली असाही करण्यात आला. त्यामुळे हा वाद आणखी वाढला. नवनीत राणा आणि रवी राणा यांना रोखण्यासाठी शिवसैनिकही आक्रमक झाले. त्यानंतर आक्रमक शिवसैनिकांनी राणा यांच्या घरावरही जोरदार आंदोलन केले. शेवटी हा वाद देशद्रोहाच्या गुन्ह्यांपर्यंत पोहोचला आणि नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतेले होते. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्यांना चौदा दिवसांची कोठडी सुनावली. मात्र काल त्यांना जामीन मंजूर झाला. जामीन मजूर होताच काल नवनीत राणा यांची सुटका करण्यात आली. मात्र रवी राणा यांच्या जामीनाची कागदपत्रं वेळेवर तळोजा जेलमध्ये न पोहोचल्याने त्यांनी कालची रात्र ही जेलमध्येच काढली.
रवी राणा जेलबाहेर, नवनीत राणा रुग्णालयात
रवी राणा यांच्या जामीनाची प्रक्रिया आज पूर्ण झाल्याने त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली. त्यानंतर जेलमधून बाहेर पडलेल्या राणांच्या हातात हनुमान चालीसा दिसून आली. गाडीत बसल्या बसल्या रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्यास पुन्हा सुरूवात केली. तसेच ती हनुमान चालीसा माध्यमांनाही दाखवली. कोर्टाने रवी राणा यांना नवनीत राणा यांना जामीन देताना त्यांच्या वक्तव्यांवर काही मर्यादा घातल्या आहेत. त्यांनी त्याचे उल्लंघन केल्यास जामीन रद्दही होऊ शकतो. त्यामुळे रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखवत हा सूचक इशारा केला आहे.