अमरावती : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा वेगळा गट तयार केला. ते 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीत गेलेत. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात (in danger) आलंय. अशावेळी शिवसेना-भाजपची युती होऊ शकते. असं झालं तर रवी राणा यांना कदाचित मंत्रीपदही मिळू शकते. पण, या सर्व शक्यता आहेत. सध्यातरी काही सांगता येत नाही. तरीही राणा यांच्या कार्यकर्त्यांना रवी राणा यांना मंत्री म्हणून पाहायचं आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर मंत्रीपदाचे पोस्टर्स (Ministerial post) लावले आहेत. मराठीत एक म्हण आहे, उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग, अशी काहीसी परिस्थिती राणा यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत दिसत आहे. अद्याप ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद कायम आहे. भाजपची सरकार बसलेली नाही. तरीही काही उत्साही (enthusiastic) कार्यकर्ते राणा यांना मंत्रीपद मिळाल्यासारखे वागत आहेत.
बाळू इंगोले पाटील या कार्यकर्त्यानं सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यानुसार, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री रवीभाऊ राणा यांचे मनःपूर्वक अभिनंदन अशाप्रकारची पोस्ट टाकली आहे. राणा हे मंत्री झालेले नाहीत. त्यामुळं ते अमरावतीचे पालकमंत्रीही नाहीत. पण, ते लवकरच मंत्री व्हावेत. पालकमंत्री व्हावेत, यासाठी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी गुडघ्याला जणू बाशिंग लावले आहे. त्यांना राणा यांना मंत्री, पालकमंत्री म्हणून पाहायचे आहे. त्यासाठी त्यांना अतिशय घाई झाली आहे.
आमदार रवी राणा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजकीय वैर साऱ्यांनाच माहीत आहे. रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसावरून ठाकरेंना लक्ष केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं राणा दाम्पत्यांना कैदेत टाकलं. तिथून सुटून आल्यानंतर ठाकरे सरकारला सुबुद्धी यावं, असं नेहमी राणा दाम्पत्य म्हणत होते. शिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप केला जात होता. राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी, अशीही मागणी राणा यांनी केली होती. ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येताच राणा यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. सोशल मीडियावर जाहिराबाजी करू लागले. रवी राणा हे जणू मंत्री झाल्याच्या आविर्भावात ते आहेत.