SC final decision on MLA Anil Bornare : जिल्हा परिषद ते विधानसभा आमदार, हिंदुत्वासाठी बंडाचा झेंडा हाती घेणारे कोण आहेत अनिल बोरनारे?
Supreme Court final decision on MLA Anil Bornare disqualification case : उद्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. उद्या काय होणार याकडे राजकीय वर्तुळासह अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेत बंड पुकारणाऱ्या शिंदे गटातील काही आमदारांनी आक्रमक बाण्याच्या जोरावर राजकीय वर्तुळात विशेष छाप पाडली आहे. आमदार रमेश बोरनारे हे त्यापैकीच एक आमदार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार रमेश बोरनारे करीत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रचंड तळमळ उरी बाळगून राजकारणात उतरलेले बोरनारे तळागाळात वावरून मोठे झाले आहेत. राजकारणात टिकायचे असेल तर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेवर सुरुवातीला लोकप्रतिनिधीत्व केलेलं हवे. बोरनारे यांचा राजकीय प्रवास असाच तळागाळातील मतदारांना सोबत ठेवून सुरु झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला सामाजिक बांधिलकीची एक विशिष्ट किनार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
सध्या सत्ताधारी शिंदे गटात सक्रिय असलेले बोरनारे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मते मिळवून आपल्या लोकप्रियतेची झलक दाखूवन दिली होती. आता सत्तेत राहून विकासकामांचा धडाका लावला. त्याचा फायदा होऊन त्यांचे राजकीय आणि सामाजिक वजन चांगलेच वाढले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय प्रवासाला कलाटणी
आमदार बोरनारे यांच्या राजकीय प्रवासाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे वेगळी कलाटणी मिळाली. पुढे त्यांनी विधानसभेचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आणि राजकीय वाटचाल सुरु ठेवली. त्यात त्यांना चांगलेच यश आले. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात ते उतरले. या निवडणुकीत तिन्ही तब्बल 57,000 मतांनी विजय मिळवला.
2019 मध्ये पहिल्यांदा आमदार
विशेष म्हणजे, त्यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभय चिकटदगावकर यांचे तितकेच तगडे आव्हान होते. तसे असतानाही मतदारांवर स्वतःची छाप पाडण्यात ते यशस्वी झाले आणि त्यांनी चिकटदगावकर यांचा पराभव केला. 2019 मध्ये ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करताना त्यांना प्रशासकीय कामांचा चांगलाच अनुभव आला होता. त्या जोरावर त्यांनी आमदारकीमध्ये स्वतःला सिद्ध करण्यास सुरुवात केली.
बाळासाहेबांवरील निष्ठेपोटी शिंदे यांच्यासोबत बंडाचा झेंडा हाती घेतला
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचा रमेश बोरनारे यांच्यावर प्रचंड मोठा प्रभाव दिसून येतो. औरंगाबाद जिल्ह्यातील चिंचडगावसारख्या ग्रामीण भागात जन्मलेले बोरनारे यांनी राजकीय मैदानात मोठी उडी घेण्याचा निर्धार केला होता. बाळासाहेबांच्या आक्रमक बाण्याप्रमाणे ते समाजात वावरू लागले होते. अत्यंत स्वाभिमानी नेतृत्व अशी त्यांची जनमानसात ओळख आहे. तसेच पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरील निस्सीम निष्ठेपोटी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यानुसार ते बाळासाहेबांच्या विचारांच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरु ठेवण्यास एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ देत आहेत.