आघाडीची वज्रमूठ सैल? नाना पटोले नाराज?, आजारपणाचं कारण देऊन सभेला दांडी; आज राहुल गांधी यांना भेटणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच्या संभाजीनगरमधील सभेला दांडी मारली. आजाराचं कारण देऊन त्यांनी दांडी मारली. पण आज ते गुजरात दौऱ्यावर जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नागपूर : संभाजीनगरमध्ये काल महाविकास आघाडीची महाविराट सभा झाली. पहिल्यांदाच संभाजीनगरमध्ये ही सभा झाली होती. या सभेला अलोट जनसागर लोटला होता. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार भाषणे केली. पण सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नाहीत. प्रकृती बरी नसल्याचं कारण देत पटोले संभाजीनगरला गेले नाहीत. मात्र, आज पटोले सुरतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटायला जात आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संभाजीनगरला जायला प्रकृती बरी नव्हती. सुरतला जाताना तब्येत कशी बरी झाली? 12 तासात पटोले ठणठणीत बरे कसे झाले? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तसेच पटोले आघाडीवर नाराज असल्याचंही सांगितलं जात असल्याने आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची चर्चा रंगली आहे.
संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची विराट सभा पार पडली. या सभेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. सभेचे टिझर्स लॉन्च करण्यात आले होते. संभाजीनगरात चौकाचौकात पोस्टर्स, होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोटो होते. आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी मोठी तयारी केली होती.
ऐनवेळी दांडी
मात्र, नाना पटोले यांनी ऐनवेळी सभेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपली प्रकृती बरी नसल्याचं कारण दिलं. पटोले हे खरोखरच तब्येत ठिक नसल्याने सभेला गेले नसावेत असा सर्वांचाच सुरुवातीला समज होता. मात्र, पटोले यांच्या सूरत दौऱ्यामुळे या समजाला धक्का पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कोर्टात केस आहे. त्यासाठी राहुल गांधी हे सूरतला जाणार आहेत. त्यामुळे नाना पटोलेही राहुल गांधी यांना भेटण्यासाठी सूरतला जाणार आहेत. नाना पटोले हे सूरतला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पटोले काल आजारी होते. त्यामुळे संभाजीनगरला आले नाही. आज ते सूरतला कसे जात आहेत? 12 तासात त्यांचा आजार बरा झालाय का? सभा टाळण्यासाठीच त्यांनी आजारपणाचा बहाना केला होता का? की यामागे पटोले यांची काही नाराजी आहे का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
या कारणामुळे नाराज
संभाजीनगरमध्ये गेल्या आठवड्यात दोन गटात राडा झाला. त्यामुळे या ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनेनंतर संभाजीनगरात तणावाचं वातावरण होतं. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याने सभा घेऊ नये, असं पटोले यांचं म्हणणं होतं. त्यांनी आघाडीतील नेत्यांनाही सभा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पण ठाकरे गट आणि राष्ट्रवादी सभेवर ठाम होता, असं कळतं. या नाराजीतूनच पटोले यांनी सभेला जाणं टाळल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पटोले सूरतमध्ये राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. यावेळी कालच्या सभेवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.