रत्नागिरी: शिवसेनेचे नेते अनंत गिते (anant geete) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बंडावर टीका केली होती. त्यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (uday samant) यांनी पलटवार केला आहे. काही लोकांना व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे व्यासपीठ मिळाल्यावर ते टीका करू लागतात. गिते यांनीही त्याच पद्धतीने टीका केली आहे. सहा महिन्यापूर्वी गीते यांनी खेडला एक मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवत असल्याचा दावा केला आहोत. एवढेच नव्हे तर गीते यांनी शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे, असं सर्वात आधी गीतेंनीच सांगितलं. त्यांनीच सुरुवात केली. त्यांची ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जात आहे, असा पलटवार उदय सामंत यांनी सांगितलं. खेडमध्ये मेळावा घेऊन गीते यांनी राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतली होती. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग गीते तेव्हा गद्दार होते का? असा खोचक सवालही सामंत यांनी केला.
उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधताना अनंत गीते यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सहा महिन्यांपूर्वी आम्ही गद्दार नव्हतो. गीते साहेबांची भूमिका आम्ही पुढे नेली. त्यामुळे आम्ही गद्दार झालो, असा चिमटाही सामंत यांनी काढला. 40 आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत. काही लोक संभ्रम पसरवत आहेत. काही म्हणतात, आम्ही मनसेत, काही म्हणतात आम्ही प्रहारमध्ये जाणार. हा सर्व संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न आहे. पण आम्ही शिवसेनेतच आहोत. कुठेही गेलो नाही, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहू नये असं अनंत गीते म्हणायेच. त्यांनी ही भूमिका मांडली होती? याचे प्रामाणिक उत्तर त्यांनी द्यावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.
रत्नागिरीतल्या मेळाव्याला आम्ही महत्त्व देत नाहीत. योगेश कदम यांना ताकद द्यावी अशी सूचना देण्यात आली होती. त्यानंतर दीड महिन्यानंतर राष्ट्रवादी सोबत युती करायला पाहिजे अशा सूचना आल्या होत्या. योगेश कदम यांचे खच्चीकरण करण्याच्या माझ्या कुठल्या ही भावना नव्हत्या, असा खुलासाही त्यांनी केला.
फारच निष्ठावंताचे वातावरण निर्माण केलं जातंय. काही दिवसात हेच लोक बाजूला झालेले दिसतील. आम्ही शिवसेनेत नसतो तर निवडणूक आयोगाकडे केस चालू झाली नसती. एकनाथ शिंदे आम्ही शिवसेनेत आहोत असंच सांगतायत, असंही ते म्हणाले.
माझ्या संपर्कात सिंधुदुर्गपासून रत्नागिरीपर्यत सर्व शिवसैनिक आहेत. शिवसेना ही एकसंघ आहे. गद्दार, बाडगा हे शब्द फेमस आहेत. हे शब्द वापरल्याशिवाय टाळ्या मिळत नाहीत, असं सांगतानाच उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत आणि राहतील. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मला माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. कोण काय बोलतं याला मी किंमत देत नाही, असंही ते म्हणाले.