‘अजितदादांनी संभाजी महाराजांचा आदर्श जरुर घ्यावा’
'संभाजी महाराजांशी तुलना करण्याचा उद्देश नाही परंतु अजितदादांनी संभाजी महाराजांचा आदर्श जरुर घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केली आहे
मुंबई : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी ‘घरवापसी’ ( Ajit Pawar Returns) करावी, यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न पक्षातून होत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचा वर्षानुवर्षांचा मित्रपक्ष काँग्रेसमधूनही ‘अजितदादा परत या’ असा सूर उमटत आहे. ‘अजितदादांनी संभाजी महाराजांचा आदर्श जरुर घ्यावा’ अशा भावना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केल्या आहेत.
‘संभाजी महाराजांशी तुलना करण्याचा उद्देश नाही परंतु अजितदादांनी संभाजी महाराजांचा आदर्श जरुर घ्यावा. तेही परत फिरले होते. पुढे पुन्हा अनेक पिढ्यांचे आदर्श नायक झाले. दादांनी असंगाशी संग सोडावा ही विनंती!’ असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.
संभाजी महाराजांशी तुलना करण्याचा उद्देश नाही परंतु अजितदादांनी संभाजी महाराजांचा आदर्श जरुर घ्यावा. तेही परत फिरले होते. पुढे पुन्हा अनेक पिढ्यांचे आदर्श नायक झाले. दादांनी असंगाशी संग सोडावा ही विनंती!
— Sachin Sawant (@sachin_inc) November 26, 2019
दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनिल तटकरे यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर रविवारी (24 नोव्हेंबर) जयंत पाटील दोनदा अजित पवार यांच्या घरी जाऊन भेटून आले. तर छगन भुजबळ यांनीही सोमवारी (25 नोव्हेंबर) अजित पवारांची मनधरणी केली.
शरद पवारांच्या गाडीत रात्री एक वाजता चेहरा लपवणारी ‘ती’ व्यक्ती कोण?
सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अन्य सदस्यांनी देखील व्यक्तिगतपणे संपर्क करुन त्यांना परतण्याचे आवाहन केले. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून लाडक्या दादाला साद घातली होती. तर पुतणे रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना परतण्याची विनंती केली होती. याशिवाय रुपाली चाकणकर, विद्या चव्हाण यांनीही अजित पवारांना परत येण्याची विनवणी केली.
पदभार स्वीकारलाच नाही
देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा पदभार काल स्वीकारला. त्यामुळे अजित पवारही कालच उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार होते. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नसल्याचं समोर आलं. मंत्रालयात गेलेले अजित पवार कार्यभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी परतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणीचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरण्याची चिन्हं दिसत होती.
Ajit Pawar Returns