लातूर : धाकल्या भावाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख (Riteish and Dhiraj Deshmukh) सध्या लातूर ग्रामीण मतदारसंघात पूर्ण वेळ देतोय. गावा-गावात जाऊन धीरज देशमुख (Riteish and Dhiraj Deshmukh) यांना निवडून देण्याचं आवाहन रितेश करतोय. रितेशच्या सोबतीला पत्नी जेनेलिया आणि पूर्ण देशमुख कुटुंबीय आहे. मोठ्या सभांमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब एका मंचावर दिसून येतं. तर दिवंगत नेते विलासरावांच्या पत्नी वैशालीताई देशमुख या निवडणुकीत विशेष लक्ष घालत आहेत. कारण त्यांचे दोन्ही सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख, तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणूक लढवत आहेत. धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या अगोदर राजकारणाचे धडे गिरवले आहेत. वडील विलासराव देशमुख आणि मोठा भाऊ अमित देशमुख यांच्यामुळे धीरज देशमुखांनी राजकारण जवळून पाहिलं आहे.
धाकटा भाऊ निवडणुकीला पहिल्यांदाच उभा राहतोय म्हटल्यावर रितेश देशमुखही लातुरात पोहोचला. त्याने उमेदवारी दाखल करण्यापासून ते गावा-गावातल्या प्रचारात पुढाकार घेतला आहे. विलासरावांमुळे काँग्रेसचा गड बनलेल्या या लातूर मतदारसंघात धीरज देशमुखांचं स्वागत होतंय. कार्यकर्त्यांतही उत्साह निर्माण झाला आहे. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
रितेश जातो तिथे जंगी स्वागत आणि लोकांची गर्दी, ढोल-ताशांचा धडाका आणि रितेशच्या भाषणाचा तडका असतो. धीरज देशमुख राजकारणात नवखे असले तरी त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं राजकारण त्यांना प्रचारात मदत करत आहे. लातूरमधील या दोन मतदारसंघांमध्ये देशमुख कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.