रितेश-जेनेलिया घेणार महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची सपत्नीक मुलाखत
'व्हॅलेंटाईन्स डे'च्या निमित्ताने नांदेडमध्ये आयोजित ‘आनंदाचे डोही’ कार्यक्रमात रितेश-जेनेलिया अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांची मुलाखत घेणार आहेत
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेचं बॉलिवूडमधील लाडकं सेलिब्रिटी कपल राजकारणातील एका प्रसिद्ध जोडप्याची मुलाखत घेणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत (Riteish Genelia to Interview Ex CM) घेणार आहेत.
‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने नांदेडमध्ये आयोजित ‘आनंदाचे डोही’ कार्यक्रमात ही महाराष्ट्राची मेगामुलाखत रंगणार आहे. 14 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली जाणार आहे.
दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण कौटुंबिक आयुष्यात कसे होते? करड्या शिस्तीचे भोक्ते असलेल्या ‘नानां’च्या हृदयाचा हळवा कोपरा कोणता होता? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीत मिळणार आहेत.
महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने हा कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडेल.
चव्हाण दाम्पत्याची अनोखी खासियत
अशोक चव्हाण-अमिता चव्हाण यांची जोडी काही महिन्यांपूर्वी खासदार-आमदाराचीही जोडी होती. 2014 ते 2019 या कालावधीत अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते, तर अमिता चव्हाण भोकरमधून आमदार. परंतु लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अशोक चव्हाण पराभूत झाले. यंदा अमिता चव्हाण यांच्या मतदारसंघातून अशोक चव्हाण विधानसभेला निवडून आले आहेत. परंतु अमिता चव्हाण यंदा विधीमंडळात नसतील.
दरम्यान, चव्हाण दाम्पत्याच्या मुलाखत कार्यक्रमाला (Riteish Genelia to Interview Ex CM) नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केलं आहे.