रमेश लटके यांच्या ‘त्या’आठवणीला उजाळा देत ऋतुजा लटके यांची प्रचाराला धडाक्यात सुरुवात
शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
मुंबई : अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकारण चांगलचं तापलं आहे. जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपकडून (BJP) मुरजी पटेल (Murji Patel) यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आम्हीच विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली.
रमेश लटके यांच्या आठवणींना उजाळा
ऋतुजा लटके यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या प्रचाराचा पहिला दिवस आहे. गणेशाचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी रमेश लटके यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. लटके साहेब नेहमी गणपती मंदिरात येऊन आधी बाप्पाचं दर्शन करायचे आणि नंतर प्रचारला सुरुवात करायचे. आम्ही देखील आज गणपतीचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर प्रचाराला सुरुवात करत आहोत, असं लटके यांनी म्हटलं आहे.
सच्चा शिवसैनिक पाठिशी
यावेळी बोलताना ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे की, मला खात्री आहे मीच निवडून येईल. सच्चा शिवसैनिक माझ्या पाठिशी उभा आहे. मी काल जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते, तेव्हा झालेली गर्दीच सर्वकाही सांगत होती, लटके साहेबांवर ज्यांची निष्ठा आहे, प्रेम आहे ते सर्व माझ्यासोबत आहेत, असं लटके यांनी म्हटलं आहे.