“सोनिया गांधी यांनी देशासाठी त्याग केला, राहुल गांधी यांचे विचार साईबाबासारखेच”
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची स्तुती करण्यात आली आहे. वाचा...
शिर्डी : पुन्हा एकदा काँग्रेसची मोट बांधण्याासाठी, नवी बळकटी देण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ सध्या सुरु आहे. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आपल्या नेत्या कार्यकर्त्यांसह पायी चालत वाटचाल करत आहेत. हे सगळं एका बाजूला सुरु असतानाच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) शिर्डीत दाखल झाले. त्यांनी पहिल्यांदाच शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांच्याबाबत आपलं मत व्यक्त केलंय.
सोनिया गांधींनी देशासाठी त्याग केलाय. सोनिया गांधींना ईडी कार्यालयात बोलावण्याऐवजी घरी जाऊन सुद्धा चौकशी करता आली असती. पण तसं झालं नाही. जे राजकरण केलं जातंय ते खूप चुकीचं आहे, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या प्रयत्नांना अजून शक्ती मिळावी, हीच साई चरणी मी प्रार्थना करतो. राहुल गांधींचे विचार साईबाबांच्या सारखेच आहेत. राहुल गांधीसुद्धा सर्वधर्म समभाव मानतात, असं रॉबर्ट वाड्रा म्हणालेत.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत लोक जोडले जात आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत देशातील जनता आहे. जनतेच्या साथीने राहुल गांधी मजल गाठणार, असं वाड्रा यांनी म्हटलंय.
नवे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे विचार सोनिया गांधींना ठावूक आहेत. त्यामुळे जनता काँग्रेसला पाठिंबा देईल. नवीन अध्यक्ष जनतेत जाऊन देशाला पुढे नेतील, असा विश्वासही वाड्रा यांनी व्यक्त केलाय.
आज पहिल्यांदाच मी साईबाबांचं दर्शन घेतलं.त्यामुळे शक्ती मिळाली. साईबाबांचे विचार सर्वसमावेशक होते. साईंच्या सर्वधर्मसमभाव संदेशाची आज देशाला गरज आहे. साईबाबांच्या दरबारी अन्नदान करणार असल्याचंही वाड्रा म्हणालेत.