एमआयडीसीच्या मुद्द्यावरून काका-पुतण्यांची जुंपली, रोहित पवार म्हणाले, अजितदादा अर्धवट माहितीच्या…
रोहित पवार यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. संजय शिरसाट यांनी त्यांच्याकडे काय सुरू आहे हे पाहावे. हिंमत असेल तर, माझ्या समोर येऊन वक्तव्य करावे. उगाच उघड्या डोळ्यांनी टिमकी लावू नका, अशी टीकाच त्यांनी केली.
मुंबई | 24 जुलै 2023 : पाटेगाव-खंडाळा-कर्जत- अहमदनगर एमआयडीसी निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आमने सामने आले आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात जुंपली आहे. अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनावर खोचक टीका केली होती. तर, रोहित पवार यांनी अजितदादा अर्धवट माहितीच्या आधारे बोलत असल्याचा आरोपच करून अजितदादांना उघडं पाडलं आहे. पहिल्यांदाच काका पुतण्याची जुंपल्यानंतर आता पुतण्याच्या टीकेला काका काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाटेगाव-खंडाळा-कर्जत- अहमदनगर एमआयडीसीसाठी रोहित पवार यांनी आज आंदोलन सुरू केलं होतं. विधान भवनाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पायरीवर बसून रोहित पवार यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. रोहित पवार यांचं म्हणणं ऐकून घ्या. त्यांच्या मागण्या रास्त असतील तर त्या मंजूर करा, अशी भावना सदस्यांनी सभागृहात व्यक्त केली.
असं बसणं योग्य नाही
त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिलं. यावेळी अजित पवार यांनी एक सरकारी पत्रच वाचून दाखवलं. 1 जुलै 2023 ला आपले 22 जूनचे पत्र मिळाले. पाटेगाव-खंडाळा-कर्जत-अहमदनगर येथे औद्योगिक वसाहत जाहीर करण्या संदर्भात पत्र विभागास प्राप्त झाले आहे. तरी पावसाळी अधिवेशनात संबंधितांची बैठक घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल.
त्यामुळे उपोषणाचा घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा, असं या पत्रात नमूद असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच, मंत्री महोदय पत्र देतात, अधिवेशन संपलेलं नाही. एमआयडीसीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यावर त्याची गंभीरतेने नोंद घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आंदोलनाला बसणं उचित नाही, अशी टीका अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता केली.
त्यावर बोलणार नाही
अजित पवार यांच्या या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझं पत्र होतं त्याला लावलेले कागदपत्र होते. ते वेळेअभावी दादांनी पाहिले नसावेत. जे पहिलं पत्र होतं तेच त्यांनी पाहिलं असावं. अधिवेशनात हा प्रश्ना मार्गी लावू असं सामंत यांनी त्यात म्हटलं आहे. त्यामुळे अर्धवट माहितीवर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर मी काही बोलणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांचं ट्विट…
दादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. एमआयडीसीचा विषय हा आजचा नाही. तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला. परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली.
मा. @AjitPawarSpeaks दादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. #MIDC चा विषय हा आजचा नाही तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला.… pic.twitter.com/4u1quC8BGT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 24, 2023
त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझी आपणास विनंती आहे की, उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील!, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तर आंदोलन करू
एमआयडीसीसाठी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये परवानगी मिळाली. पण अधिसूचना मिळत नाही. माझ्या मतदारसंघातील युवकांच्या हक्कासाठी मी लढत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शब्द दिला आहे. अधिसूचना अधिवेशन संपण्याच्या अगोदर निघणार आहे. राज्याचे मंत्री म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मी माझे आंदोलन मागे घेत आहे. उद्याची बैठक महत्त्वाची असेल. नाहीतर असंख्य युवा मुंबईत आंदोलन करतील. ही एमआयडीसी मंजूर झाली नाही तर, माझ्या मतदारसंघातील हजारो युवक येऊन मुंबईमध्ये आंदोलन करतील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.