एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरतात?; रोहित पवार यांचा खोचक सवाल
महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेलेत यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण त्याचवेळी टिकलीचा विषय येतो. कुठला तरी नेता खालच्या भाषेत बोलतो. हे षडयंत्र आहे का?
पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान केल्यानंतर विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला या मुद्द्यावरून विरोधकांनी सवाल विचारण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरत आहेत का? असा सवालच रोहित पवार यांनी केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवा. ही व्यक्ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे. एवढे दिवस ही व्यक्ती महाराष्ट्रात कशी काय राज्यपाल म्हणून राहते? त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर काही बोलत नाही. ते राज्यपालांना घाबरतात का? त्याबद्दल माहीत नाही, असं रोहित पवार म्हणाले.
हे लोक राज्यपालांना घाबरतात की नाही माहीत नाही. पण महाराष्ट्र कधीही घाबरणार नाही. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिपाठीनं घाणेरडं वक्तव्य केलं. यांच्या पाठीशी नक्की कोण आहे? सत्तेत असलेली लोकं काही बोलत नाहीत. सावरकरांवर बोलायला पुढे आले. मात्र आज कुठे दिसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी बोलत असेल आपण शांत कसं बसणार? ती आपली अस्मिता आहे इतिहास आहे. शिवाजी महाराज नसते तर आपली परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षाही विचित्र झाली असती. या राज्याला वैचारिक बैठक आहे ती मलीन करण्याचा प्रयत्न होतो आहे. याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे, असं ते म्हणाले.
महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेलेत यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण त्याचवेळी टिकलीचा विषय येतो. कुठला तरी नेता खालच्या भाषेत बोलतो. हे षडयंत्र आहे का? काही लोकं यासाठीच काम करतात, अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधींची यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा तिला चांगला प्रतिसाद मिळाला. दक्षिणेत कोणीही त्यांची यात्रा दाखवली नाही. मात्र महाराष्ट्रात पत्रकारिता जिवंत आहे. माध्यमात मोठा बदल होतोय, असं ते म्हणाले.