लोकांमध्ये उत्साह बळजबरीने आणता येत नाही; निष्ठा…रोहित पवारांचा दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाला टोला
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी लागोपाठ दोन ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
मुंबई : दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांकडून एकोमेंकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. अखेर बुधवारी बीकेसीवर (BKC) शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडला. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी लागोपाठ दोन ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, मात्र किल्ला अभ्यद्य असल्याचं सिद्ध झालं. निष्ठा जिंकली अशा अशयाचं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?
रोहित पवार यांनी लागोपाठ दोन ट्विट करत शिंदे सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखादा-दुसरा बुरुज ढासळू शकतो ,परंतु सामान्य कार्यकर्ते ,जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली’.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, ‘कालच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह-निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही, माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झालं’
कोणाच्या मेळाव्याला किती कार्यकर्त्यांची उपस्थिती?
शिंदे गटाचा आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर मुंबई पोलिसांकडून याबाबतची अंदाजे आकडेवारी जारी करण्यात आली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार शिंदे गटाच्या मेळाव्याला दोन लाख तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला एक लाख एवढी गर्दी होती.