मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी राष्ट्र्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीला भेट दिली. निमित्त होतं बारामतीमधील विज्ञान केंद्राच्या उद्घाटनाचं. गुरुवारी गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी एक वेगळंच चित्र पहायला मिळालं. यावेळी एकीकडे शरद पवार आणि गौतम अदानी एकाच व्यासपीठावर दिसून आले. तर दुसरीकडे अदानी यांचं आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ज्याप्रकारे आदरातिथ्य केलं. त्याची चर्चा सर्वत्र झाली. रोहित पवार हे अदानी यांच्या स्वागतासाठी स्वत: बारामती विमानतळावर गेले होते. अदानी विमानतळावर उतरल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. इतकंच नव्हे तर रोहित यांनी स्वत: अदानींची गाडी चालवत त्यांना विज्ञान केंद्रापर्यंत आणलं. या कार्यक्रमाला अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती होती. या सगळ्यानंतर सध्या राज्यात शरद पवार आणि अदानी एकत्र आल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर वेगळंच चित्र पहायला मिळालं.
अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय समजले जातात. यातच पवार कुटुंबियांनी गौतम अदानी यांचं केलेलं आदरातिथ्य नेटकऱ्यांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. यावेळी ‘अंबानी-अदानींना शिव्या घालणार… हेच तर आहे साहेबांचं उद्योगविषयक धोरण,’ असं एका युझरनं म्हटलंय. तर अनेकांनी यावेळी पवार आणि अदानींच्या भेटीवरुन जोरदार ट्रोल केलंय.
एका युझरनं लिहिलंय की, ‘एकीकडे अदानी-अंबानींच्या नावाने मोदींवर ताशेरे ओढायचं आणि दुसरीकडे त्याच लोकांसोबत फिरायचं. सरड्यालाही लाज वाटेल, असं एका युझरनं रोहित पवार आणि अदानी यांचा फोटो टाकून कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट देखील चांगलीच चर्चेत असून वेगवेगळ्या कमेंट्स केल्याचं दिसतंय. तर काहींनी वेगवेगळ्या टीका केल्या आहेत.
‘अदानीला हे विकले, अदानीला ते विकले, अदानींच्या नावाने जयघोषणा केल्यानं अदानींचा बारामतीमध्ये रोहित पवार यांना साक्षात्कार,अदानी विकत घेण्यासाठीच येतात, तर बारामतीमध्ये पवार आता काय विकणार?’ असा सवालही एका युझरनं केला आहे.