अमित ठाकरे-रोहित पवार यांची भेट, एकत्र जेवण, सव्वा तास चर्चा
फिनिक्स मिल कंपाऊंड मधील इंडिगो हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र जेवण केलं. दुपारी 1: 30 वाजता या दोघांची भेट झाली.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विविध पक्षांचे दिग्गज नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट ताजी असतानाच, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांची भेट झाली.
फिनिक्स मिल कंपाऊंड मधील इंडिगो हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र जेवण केलं. दुपारी 1: 30 वाजता या दोघांची भेट झाली. या दोघांनी जवळपास सव्वा तास गप्पा मारल्या. आज सकाळी रोहित पवार यांनी फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार दोघांची भेट झाली.
ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन तरुण चेहरे नवी समीकरणं मांडणार का याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांची भेट घेऊन सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. फुटबॉल सोबतच तरुणांच्या अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. राजकीय चर्चासुद्धा झाल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेषता मोदी-शाह जोडीविरुद्ध रणशिंग फुंकलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काँग्रेसच्या विरोधामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसेला आघाडीत घेतलं नाही. आता विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार आणि अमित ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
कोण आहेत रोहित पवार?
रोहित पवार सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. राज्यात दुष्काळी भागात त्यांनी आजोबा शरद पवार यांच्यासोबत दौरा केला. रोहित पवार यांनी अगोदरच आपण विधानसभा लढणार असल्याचं जाहीर केलंय, यासाठी त्यांच्याकडून मतदारसंघाची चाचपणीही सुरु आहे. भाजप नेते मंत्री राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांनी पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. या तालुक्यातील विविध गावात त्यांनी टँकरही सुरु केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहेत.
कोण आहेत अमित ठाकरे?
अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमांना उपस्थित असतात.
तरुणांची फौज उभारुन संघटना बांधणीसाठी अमित ठाकरे प्रयत्नशील आहेत.
अमित ठाकरे यांचा विवाह काही महिन्यापूर्वीच झाला. या विवाहसोहळ्याला देशभरातील दिग्गज नेते उपस्थित होते