हक्काची माणसं दुरावू नयेत, रोहित पवारांची काका अजित पवारांना भावनिक साद
कुटुंबाचा एक घटक म्हणून आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं, असं मत रोहित पवार यांनी फेसबुकवरुन व्यक्त केलं आहे.
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दुरावू नयेत, असं म्हणत शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी काका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावनिक साद घातली आहे. कुटुंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं, की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं, असं मत रोहित पवार (Rohit Pawar on Ajit Pawar) यांनी फेसबुकवरुन व्यक्त केलं आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट
लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते.
अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.
आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,
पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं.
लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं. (Rohit Pawar on Ajit Pawar)
याआधी, शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंब फुटल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये याबाबत भाष्य केलं होतं. विशेष म्हणजे पत्रकारांसमोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी दिसलं. सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडल्यानंतरच मी बोलेन, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. परंतु व्हॉट्सअॅप स्टेटसमधून त्या वारंवार आपल्या भावना व्यक्त करत आहेत.