‘नाईट लाईफ’चा निर्णय स्वागतार्ह, रोहित पवारांकडून मित्र आदित्य ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक
मुंबई पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं शहर बनेल. या निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो.' असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
मुंबई : ‘मुंबईमध्ये ‘नाईट लाईफ’ला परवानगी देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. याचं संपूर्ण श्रेय माझे मित्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना जातं’ असं म्हणत राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक (Rohit Pawar praises Aditya Thackeray) केलं आहे.
‘मुंबईमध्ये ‘नाईट लाईफ’ला परवानगी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आणि याचं संपूर्ण श्रेय माझे मित्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना जातं. यामुळे मुंबईमध्ये वडापावच्या स्टॉलपासून तर हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स हे चोवीस तास सुरु ठेवता येणार आहेत. सध्या फक्त तारांकित हॉटेलमध्येच कॅफे 24 चालू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु नवीन निर्णयाचा सामान्य जनता आणि उद्योग-व्यावसायिक या दोघांनाही फायदा होईल, असं मला वाटतं. म्हणून हा निर्णय स्वागतार्ह असून मुंबईला निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं शहर बनवेल याची मला खात्री वाटते. या निर्णयाबद्दल आदित्य जी ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो.’ असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
आदित्य ठाकरेंची स्वप्नपूर्ती, मुंबईत ‘नाईट लाईफ’चा प्रयोग रंगणार
‘दिवसेंदिवस सगळीकडे भीषण बनत चाललेल्या वाहतुकीच्या प्रश्नावर आणि त्यामुळे वाढत असलेल्या प्रदूषणाच्या समस्येवरही काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल. प्रत्येक व्यावसायिक स्वेच्छेने आपलं दुकान किंवा आस्थापना सुरु ठेऊ शकतात, त्यासाठी त्यांना कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही.’ असं रोहित पवारांनी लिहिलं आहे.
‘दारु विक्री करणारे रेस्टॉरंट आणि दुकाने चोवीस तास उघडी ठेवता येणार नाहीत. तर सध्याच्या नियमानुसारच मध्यरात्री दीड वाजेपर्यंतच त्यांना दुकाने उघडी ठेवता येणार आहेत’ असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर घेण्यात आलेल्या या निर्णयाचे विकासाच्यादृष्टीने सकारात्मक परिणाम दिसतील, असं मतही रोहित पवारांनी मांडलं आहे.
काय आहे नाईट लाईफ? येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणी हॉटेल, पब्ज, मॉल्स, थिएटर 24 तास खुले राहणार आहेत.
मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजप शिवसेना युती सरकारच्या वेळी आदित्य ठाकरेंनी ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर प्रायोगिक तत्वावर यावर निर्णय घेण्यात आला आहे.
Rohit Pawar praises Aditya Thackeray