त्या दिवशी काय घडलं, हे 2 नेते सांगू शकतात, फडणवीस दुटप्पी कसे वागू शकतात? रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
निवडणूका होण्याच्या आधीपासूनच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं भाजपाला कट साइज बनवण्याचं षडयंत्र होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून सध्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. नेमक्या कोणाच्या निर्णयावरून हा शपथविधी झाला आणि नंतर हे सरकार कसं कोसळलं, याबाबत अनेक थेअरी मांडल्या जात आहेत. त्या शपथविधीच्या निर्णयामागे शऱद पवार यांची खेळी असू शकते, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केल्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या. आता शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही मोठं वक्तव्य केलंय. त्या दिवशी काय घडलं होतं, ते फक्त दोन नेते सांगू शकतात.
अजित पवार आणि शरद पवारच सांगू शकतात. मात्र फडणवीस हे सध्या जे वक्तव्य करत आहेत, ती अत्यंत दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केलाय.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
राज्यातील शपथविधीच्या चर्चांवर रोहित पवार यांनी अहमदनगर येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,’ त्या दिवशी काय घडलं हे अजितदादा आणि पवार साहेब सांगू शकतात. फडणवीस साहेब मोठे नेते आहे मी त्यांचा अनुभवाचा आदर करतो. मात्र ते म्हणाले होते काही झालं तरी आम्ही राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार नाही, राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार असं म्हटले या वक्त्यामध्ये कुठेतरी गल्लत आहे..
शिवसेना फुटली तेव्हा ते म्हणाले ते शिवसेना फोडण्यामध्ये आमचा कुठलाही सहभाग नाही. मात्र विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिवसेना फोडण्यामागचे कलाकार कोण होते.. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी हसतच प्रतिक्रिया दिली. अशी दुटप्पी भूमिका एवढ्या मोठ्या नेत्याची येते याच मला आश्चर्य वाटतं..
अशी वक्तव्य करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट काय?
निवडणूका होण्याच्या आधीपासूनच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं भाजपाला कट साइज बनवण्याचं षडयंत्र होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावेळेला थोडे भाजपचे कमी करा,शिवसेनेचे वाढतील. राष्ट्रवादीचे थोडे वाढले तर आपणही नियंत्रित करू शकू, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असावा, असा अंदाज फडणवीस यांनी व्यक्त केला.
नंतर निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला. तर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या चर्चा सुरु झाल्या. अशातच राष्ट्रवादीकडून सरकार स्थापन करण्याची ऑफर आली. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली. त्यानंतर गोष्टी (पहाटेच्या शपथविधीबाबत) ठरल्या.
अजितदादा आमच्याकडे आले. त्याांनी जी शपथ घेतली, ती प्रामाणिकपणे घेतली होती. नंतर काय ठरलं, ते तोंडघशी पडले, हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे याठिकाणीसुद्धा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात जास्त मोठा होता, कारण तो आपल्याच व्यक्तीने केला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवार यांना विश्वासात न घेता पहाटेचा शपथविधी आटोपला, या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. या निर्णयाला शरद पवार यांची मंजूरी होती, असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय.