कुणाल जायकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नगर: येत्या 5 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचा मुंबईतील बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dussehra rally) होत आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही गटाचे नेते कामाला लागले आहेत. दोन्हीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. याचवेळी भाजकडून शिवसेनेवर आरोप केले जात आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत मिळत असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचा हा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेटाळला आहे. राष्ट्रवादीने मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही. पण राष्ट्रवादीला ताकद लावण्याची गरजच काय? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला बसेसमधून लोकं आणली जातील. पण शिवतिर्थावर होणाऱ्या मेळाव्यात स्वत:हून लोक येतील. शिवसेनेच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर मैदानात जागा पुरणारही नाही. पण शिवसेनेचीच ताकद एवढी आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच मैदानात जागा पुरणार नाही. स्वतःच्या हिंमतीवर ते ताकद लावून सभा घेत असतील तर राष्ट्रवादीला ताकद लावण्याची काय गरज? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
माझ्या दोघांच्याही दसरा मेळाव्याला शुभेच्छा आहेत. दोघांचाही मेळावा मोठा व्हावा. मात्र 5 तारखे नंतर लोकांच्या हिताची कामे व्हायला हवीत. लोकांचे प्रश्न सुटावीत अशी आशा नागरिक म्हणून मी व्यक्त करतो, असंही ते म्हणाले.
एकनाथ खडसे भाजपात परत येण्याच्या चर्चेवर रोहित पवारांनी उत्तर दिलंय. जेव्हा होईल तेव्हा बघूया. तो त्यांच्या जिल्ह्याचा प्रश्न आहे, राज्याचा नाही. कदाचित लोकांचं मन विचलित व्हावं यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले असेल. त्यात काही तथ्य नसावं. या चर्चाच आहे. इतक्या चर्चा होतील की आपण थकून जाऊ, असंही ते म्हणाले.
भाजप नेते राम सातपुते यांच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजून एक विस्तार होण्याचा बाकी आहे. त्यामुळे हे वक्तव्य करतात. ते त्यांना दाखवावं लागतं. त्यामुळे मंत्रीपद मिळू शकतं. काही लोक शांत झाले होते. आता विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लोक बोलायला लागली. त्यांना किती महत्त्व द्यायचे, असा उलटा सवालही त्यांनी केला.