सासुरवाडीऐवजी कर्जत-जामखेड का निवडलं? अवधूत गुप्तेंच्या गुगलीवर रोहित पवारांचं उत्तर
अनेक जणांना वाटायचं, की पवारसाहेब रिटायर होतील, मात्र कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही, हे शरद पवार यांच्याकडून शिकल्याचं नातू रोहित पवार यांनी सांगितलं.
अहमदनगर : हडपसरचे जावई असूनही तो मतदारसंघ न निवडता कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा, ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं.’ असं रोहित पवार (Rohit Pawar Sangamner Interview) म्हणताच एकच हशा पिकला.
अनेक जणांना वाटायचं, की पवारसाहेब रिटायर होतील, मात्र कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही, हे शरद पवार यांच्याकडून शिकल्याचं नातू रोहित पवार यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.
हेही वाचा – मनसे महाअधिवेशन, शिवसेना भवनासमोर राज ठाकरेंचं भगवं पोस्टर
तुमचं संगमनेरवर प्रेम आहे, की प्रवरानगरवर? अशी गुगली अवधूत गुप्ते यांनी रोहित पवारांना टाकली. त्यावर, अहमदनगर जिल्ह्यातील एका मतदारसंघाचा आमदार आहे त्यामुळे माझं नगर जिल्ह्यासह राज्यावर प्रेम आहे, असं उत्तर रोहित पवारांनी दिलं. जेव्हापासून मी पत्रकारांशी बोलायला लागलो तेव्हापासून अशी उत्तरं द्यायला लागल्याचं रोहित म्हणाले.
हडपसरचे जावई असूनही तो मतदारसंघ न निवडता कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. ‘हडपसर मतदारसंघ सोपा होता हे तुम्ही मान्य केलं, पण कर्जत जामखेडचा गेल्या तीस वर्षांपासून विकास झाला नव्हता. ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं.’ असं रोहित पवार म्हणताच एकच हशा पिकला.
कर्जत जामखेडच्या लोकांमध्ये साखरेचे दोन-चार खडे जास्त आहेत. माझ्या आयुष्यात घराणेशाहीचा विषयच काढणार नाही. त्यामुळे मी कर्जत जामखेड निवडलं, असं रोहित पवार म्हणाले.
मी जिंकलो म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी नव्हतं तर मला खूप लोकांनी निवडून दिलं म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. माझ्या विजयात आईचा वाटा मोठा आहे. कारण आईच स्वतः मतदार संघात गेली होती. लोकांचा विश्वास तिने संपादन केला. आईला खोटं आवडत नाही, तिने विकासाचा शब्द दिला, तो मी पूर्ण करणार, अशी ग्वाही रोहित पवारांनी दिली.
किती लोकांना वाटलं पवार साहेब रिटायर होतील. पण ते म्हणाले, नाही, हार मानायची नाही आणि कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं, असं रोहित पवारांनी ((Rohit Pawar Sangamner Interview) सांगितलं.