रोहित पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा भाजपच्या वाटेवर
रोहित पवार उत्सुक असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी मंजुषा गुंड यांनी मुलाखत दिली आहे. तिकीट न मिळाल्यास त्या भाजपमध्ये जाण्याची चिन्हं आहे.
अहमदनगर : विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar Setback in Ahmednagar) यांना अहमदनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे.
मंजुषा गुंड या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आहेत. गुंड यांनी रोहित पवार यांच्याविषयी नाराजी (Rohit Pawar Setback in Ahmednagar) व्यक्त केली आहे.
इतकंच नाही, तर थेट रोहित पवार उत्सुक असलेल्या मतदारसंघाचंच तिकीट त्यांनी मागितलं आहे. गुंड यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी मुलाखत दिली आहे. तिकीट न मिळाल्यास त्या भाजपमध्ये जाण्याची चिन्हं आहे.
रोहित पवारांच्या विधानसभा उमेदवारीचा पेच वाढला
‘राष्ट्रवादी पक्ष आम्ही तळागाळात पोहचवला आहे. कर्जत-जामखेड तालुक्यात स्थानिक पातळीवर आम्ही काम केलं आहे. माझं कुटुंब गेली 40 वर्ष राजकारणात आहे. आम्ही तळमळीने पक्ष वाढवला. स्थानिक नेतृत्वाला विचारात घ्यायला हवं, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.’ असं मंजुषा गुंड (Rohit Pawar Setback in Ahmednagar) यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.
‘पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या कानावर या गोष्टी घातल्या आहेत. पवार अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येतील, तेव्हा पुन्हा चर्चा करुन आणि कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत, असं गुंड म्हणाल्या. मंजुषा गुंड भाजपात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पवार कुटुंबीयांची तिसरी पिढी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आधी, पार्थ पवारांनी लोकसभेत आपलं नशीब आजमावलं, मात्र, संपूर्ण ताकद लावूनही त्यांचा दारुण पराभव झाला. तर येत्या विधानसभेला रोहित पवार रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी पक्षाकडे रितसर अर्ज करुन कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणीही केली. मात्र त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
रोहित पवारांनी मागणी केलेला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यातच नगरमध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यात कर्जत-जामखेडसाठी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी साळुंखे यांनी उमेदवारी मागितली आहे.