तुम्हाला साहेबांचं प्रेम कधी कळलंच नाही, रोहित पवारांची प्रफुल्ल पटेलांवर कडाडून टीका
बंड केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पटेल यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मुंबई : बंडानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या काल झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणारे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे. तुम्हाला साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, अशी टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली आहे.
रोहित पवार रोज ट्विट करत अजित पवार गटावर निशाणा साधत आहेत. थोड्या वेळापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार ?
प्रफुल्ल पटेल साहेब, मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली. जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं..म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी पटेलांवर टीकास्त्र सोडले आहे.
आपले वडील मनोहरभाई यांच्या निधनानंतर पवार साहेबांनी आपल्यावर दाखवलेलं प्रेम आणि माया सर्वश्रृत आहे. पवार साहेबांचा सखा, सोबती म्हणून आपली राजकारणात ओळख होती. पण असं काय झालं की, आपल्यालाल मोठं करणाऱ्या आपल्याच गुरूला आपण फसवलं ? असा सवालही प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला आहे.
तुम्हाला काय केलं होतं कमी ? का पत्करली गुलामी ?
प्रफुल्ल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली… जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच… pic.twitter.com/wT9js2kcph
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 6, 2023
काय म्हणाले होते प्रफुल्ल पटेल ?
अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही चूक होती तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सत्तेत का बसवले? त्यांना विरोधी पक्षनेते पद का दिलं ? असा थेट सवाल प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना केला. एमईटी मैदानावरील मेळाव्याला संबोधित करताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच मी पुस्तक लिहीलं तर मोठा भूकंप होईल, असा दावाही त्यांन कालच्या भाषणात केला होता.