अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. 2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. दुर्दैवानं तसं झालं नाही, असा दावा रोहित पवार यांनी केलाय. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या 8 व्या स्मृतीदिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते.
‘2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. मात्र, दुर्दैवाने त्यावेळी तसं झालं आहे. गोपीनाथ मुंडे आता असते तर राजकारणाची पातळी इतकी खाली गेली नसती. विरोधक म्हणून विरोध झाला असता. मात्र, पातळी खाली गेली नसती, ते असते तर राजकारणाची पातळी वर असती’, अशा शब्दात रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केलीय.
रोहित पवार पुढे म्हणाले की. ‘ विरोध झाला असता, सगळ्या पक्षात वाद झाला असता, पण पातळी आणि संस्कृती सोडून कुणी बोललं नसतं. आज ते नसले तरी तुमच्या आमच्या मनात ते आहेत. त्यांचा विचार घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, त्यांनी ज्या पद्धतीने समाजकारण केलं, त्यांनी ज्या पद्धतीने लोकांची काळजी केली, त्या पद्धतीनेच आपण यापुढे काम करायचं आहे. त्यांचेच विचार पुढे नेण्याचं काम धनंजय मुंडे करत आहेत’.
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना टोला लगावलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या वाट्याला जो संघर्ष आला तोच माझ्याही वाट्याला आहा. हा संघर्ष आमच्या कुटुंबाच्या पाचवीला पुजलेला आहे. प्रत्येकालाच कळेल असं नाही पण या संघर्षाचा काही भाग माझ्या वाट्याला आलाय. कदाचित पंकजा मुंडेंना आता वाटत असेल की त्यांच्याही वाट्याला संघर्ष आला आहे. मुंडे साहेबांचा संघर्ष हा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर होता, व्यक्तिगत नव्हता आणि त्या संघर्षाला आम्ही आज नतमस्तक झालोय, असंही मुंडे म्हणाले.