युतीचा मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा? रामदास आठवले म्हणाले…

| Updated on: Sep 10, 2019 | 9:06 AM

महाराष्ट्रात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा (Maharashtra CM) फॉर्म्युला असणार नाही, असं भाकीत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वर्तवलं आहे. ते सोमवारी (9 सप्टेंबर) रात्री उल्हासनगरमधील एका कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते.

युतीचा मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा? रामदास आठवले म्हणाले...
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा (Maharashtra CM) फॉर्म्युला असणार नाही. ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री होईल, असं भाकीत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वर्तवलं आहे. ते सोमवारी (9 सप्टेंबर) रात्री उल्हासनगरमधील एका कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) जागावाटपात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. महाराष्ट्रात ज्याच्या जास्त जागा येतील, त्याचाच मुख्यमंत्री होईल आणि राज्यात भाजपच्याच सर्वाधिक जागा येतील.”

‘शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही, तर उपमुख्यमंत्रीपद मिळेल’

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याची हवा काढतानाच आठवले यांनी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद जरुर मिळेल, असंही भाकीत वर्तवलं. दुसरीकडे गणपती झाल्यानंतर जागावाटपाची अंतिम चर्चा होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

‘आरपीआयची 25 जागांची मागणी’

एकीकडे शिवसेनेच्या दाव्याला अतिशयोक्ती ठरवताना स्वतः रामदास आठवलेंनी देखील असाच दावा केला. ते म्हणाले, “जागावाटपाची अंतिम चर्चा होणार आहे. त्यात आरपीआयने घटकपक्षांसाठी 25 जागांची मागणी केली आहे. त्यापैकी किमान 10 जागा आरपीआयला मिळतील.”

‘कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 5 ची, आठवले रात्री साडेदहाला पोहचले’

दरम्यान, उल्हासनगरमधील गोल मैदानात आयोजित केलेल्या संबंधित कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 5 ची होती. मात्र, आठवले चक्क रात्री साडेदहा वाजता आले. त्यामुळे आयोजकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे पोलिसांनी रात्री 10 वाजताच साऊंड ऑपरेटरला ताब्यात घेत आवाज बंद केला होता. मात्र, आठवले आल्यानंतर या ठिकाणी भाषण केले. यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याने याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.