तुरुंगात असलेल्या रत्नाकर गुट्टेंचा गंगाखेडमध्ये दणदणीत विजय
कुटुंबीयांनी जोरदार प्रचार केला आणि विजय खेचून आणलाय. विशेष म्हणजे महायुतीमध्ये शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आलेला असतानाही गुट्टे यांनी विजय मिळवला.
परभणी : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने राज्यात एकमेव जागा जिंकत खातं उघडलंय. गंगाखेडमधून रासपचे रत्नाकर गुट्टे (Gangakhed Ratnakar Gutte) यांनी विजय मिळवला. रत्नाकर गुट्टे (Gangakhed Ratnakar Gutte) सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत कुटुंबीयांनी जोरदार प्रचार केला आणि विजय खेचून आणलाय. विशेष म्हणजे महायुतीमध्ये शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आलेला असतानाही गुट्टे यांनी विजय मिळवला.
शिवसेनेने गंगाखेडमध्ये मदत करावी, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली होती. मात्र शिवसेनेकडून विशाल कदम यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे विशाल कदम आणि रत्नाकर गुट्टे यांच्यातच प्रमुख लढत झाली. राष्ट्रवादीचे मधुसुदन केंद्रे यांना केवळ 5365 मते मिळवता आली.
गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे यांना 49871, विशाल कदम 47196, वंचितच्या करुणाबाई कुंडगीर 17062 आणि अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांनी 31374 मते मिळवली. मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन झाल्यामुळे रत्नाकर गुट्टे यांचा विजय सुकर झाला.
कोण आहेत रत्नाकर गुट्टे?
शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी रत्नाकर गुट्टे सध्या तुरुंगात आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर गंगाखेडच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र कोर्टाने जामीन दिला नाही. यानंतर औरंगाबाद खंडपीठानेही दिलासा देण्यास नकार दिला. यानंतर ईडीकडून गुट्टे यांच्या संपत्तीवर छापेमारी करण्यात आली होती.
रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी. 2014 लाही त्यांनी रासपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. परळीच्या थर्मल प्लाँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत.
परभणी जिल्ह्यातील इतर निकाल
- जिंतूर – मेघना बोर्डीकर, भाजप
- परभणी – राहुल पाटील, शिवसेना
- गंगाखेड – रत्नाकर गुट्टे, रासप
- पाथरी – सुरेश वर्पूरडकर, काँग्रेस