मुंबई : रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा (Ncp Women President) राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (State Women commission president) आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यानंतर सहाजिकच महिला प्रदेशाध्यक्ष पदही रिकामे झाले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आलं होतं. आता महिला प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. त्यामुळे त्यांचे ते काम पाहता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रुपाली चाकणकर यांची अल्पावधीत मोठी झेप
रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळलं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेललीय. आता त्यांच्यावर राज्य महिला आयोगाची भिस्त असणार आहे.
समाजकारणातही मोठा सक्रिय सहभाग
सुरुवातीच्या काळात केवळ राजकारण नाही तर समाजकारणही मोठ्या प्रमाणात केलं आणि करत आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे शब्द बोथट ठरतात जेव्हा महिला सुरक्षित नसतात. पण महिल्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मी वैयक्तिकरित्या काम करत आहे. पण मला पुढे जाऊन सांगायचं आहे की, प्रत्येक महिलेला तिचं अस्तित्व असतं. महिलेचा संघर्ष हा जन्मापासून तो तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु असतो. शाळा, महाविद्यालयातील मुली, शेतकरी महिला, नोकरदार महिला अशा सगळ्यांना एक वेगळा संघर्ष करावा लागतो. अनंत अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या सगळ्या अडचणींना तोंड देत तिनं स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे या मताची मी आहे, असे चाकणकर अनेकदा सांगतात.