कोल्हापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि पवार कुटुंबावर जोरदार टीका करत असतात. पडळकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. ‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असे दहा-वीस शरद पवार खिशात घालून फिरतात’, असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही जोरदार पलटवार केला जातोय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही पडळकरांना प्रत्युत्तर दिलंय. पडळकरांचं वक्तव्य म्हणजे विकृत मनोवृत्तीचं लक्षण असल्याची टीका चाकणकरांनी केलीय.
दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि हे सरकार अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. कोरोनासारख्या महामारीत राज्याच्या पालकत्वाची जबाबदारी कशी निभवावी हे महाविकास आघाडी सरकारनं दाखवून दिलंय. महाराष्ट्र आणि जनतेची काळजी घेत असताना महाविकास आघाडीसोबत राज्यातील जनताही उभी राहिली. विरोधकांना आता हे सहन होत नाही. त्यांच्याकडे टीका करण्यासाठी विषय नाहीत. कोणतेही पुरावे हातात नसताना केवळ महाविकालस आघाडी सरकारवर टीका करायची आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, हा एककलमी कार्यक्रम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करत आहेत, याचा अर्थ हे त्यांच्या मानसिक नैराश्याचं प्रतिक आहे. त्यांना किती नैराश्य आलेलं आहे, हे त्यांच्या सततच्या वक्तव्यातून दिसून येतं’, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिलंय.
देवेंद्र फडणवीस हे दहा-वीस पवार खिशात घालून फिरतात. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीत. त्यांचा विषय असा आहे की, काहीही केले, तर मीच केले. माझ्यापेक्षा कोण पुढे जाता कामा नये, अशी त्यांची वृत्ती आहे. पण, माननीय देवेंद्रजी असे दहा-वीस शरद पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा किती तरी प्रगल्भ नेतृत्व देवेंद्रजींचे आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधातली भूमिका ही शरदचंद्र पवारांची आहे. तसले विषय सोडून त्यांच्या पुढचे नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्रजींच्या नेतृत्वात आहे, अशा शब्दात पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
इतर बातम्या :