मुंबई : महाराष्ट्रात मंदिरं न उघडण्यावरून राजकारण आता अधिकच पेटू लागलं आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील उडी घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांवर आणि राज्य सरकारवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Rupali chakankar slams Amruta Fadnavis)
अमृता फडणवीसांबाबत बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून अमृता फडणवीस यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे, यावर त्यांनी वेळेत उपचार करायला हवेत. यापूर्वीदेखील आम्ही त्यांना तसा सल्ला दिला आहे.
अमृता फडणवीस यांनी बुधवारी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते! असे लोक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) लागू करण्यात सक्षम नसतात”.
वाह प्रशासन – bars and liquor shops are wild wide open but temples are danger zones ?
Definitely sometimes ‘certificate’ is required to prove the saneness of some dicey creatures who are incapable of having SOPs in place ! ?? #Maharashtra— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 13, 2020
अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर रुपाली चाकणकर यांनीदेखील ट्विटद्वारे अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे. चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या ‘Dicey Creature’ ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही. त्यामुळे आजच्या आनंदीबाईंनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा”.
राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या ‘Dicey Creature’ ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही.त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.(1/2)@fadnavis_amruta
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 14, 2020
दरम्यान, चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरं खुली करण्याबाबत सूचना करणाऱ्या राज्यपलांच्या भूमिकेबाबतची नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचे राज्यपाल (भगतसिंह कोश्यारी) एकच आहेत. परंतु त्यांची महाराष्ट्राबाबतची भूमिका वेगळी आणि गोव्याबाबतची भूमिका वेगळी आहे. भाजपशासित राज्यात त्यांची मानसिकता वेगळी आहे तर इतर राज्यात वेगळी. कोश्यारी यांनी जसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले तसेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही लिहायला हवे”.
चाकणकर म्हणाल्या “राहिला प्रश्न मंदिराचा, मंदिर प्रत्येकाच्या मनातच असतं. आपण सर्वजण पाहताय की माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेची आणि आपल्या पालकत्वाची जबाबदारी निभावत आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एक होऊन कोरोनाशी लढा द्यायला हवा. परंतु अशा परिस्थितीत हे लोक विनाकारण टोकाचे राजकारण करत आहेत”.
“वाद ओढवून घेण्याची अमृता फडणवीसांची सवयच दिसते. महाविकास आघाडीचा कोणताही निर्णय कितीही चांगला असला तरी त्यांना तो वाईटच दिसतो. त्यांनी त्यांच्या मानसिकतेमध्ये, विचारांमध्ये थोडासा बदल करायला हवा”.
संबंधित बातम्या
बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अमृता फडणवीसांचा टोला
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या लेटर वॉरमध्ये कंगनाची उडी, ठाकरे सरकराला ‘गुंडा’ची उपमा
मंदिरात जाणारे भक्त लाखो, दारुच्या दुकानात रांगेतून प्रवेश, अमृता फडणवीसांना विद्या चव्हाणांचे उत्तर
(Rupali chakankar slams Amruta Fadnavis)