“राष्ट्रवादी आणि दाऊदचे संबंध असल्याचे पुरावे दाखवा”, रुपाली पाटील यांचं राहुल शेवाळे यांना आव्हान
रुपाली पाटील यांचं राहुल शेवाळे यांना आव्हान, म्हणाल्या...
पुणे : शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. ठाकरेगटाने शेवाळे यांच्यावर हे आरोप केलेत. त्यानंतर शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळून लावलेत.त्याचसोबत या सगळ्या आरोपांमागे ठाकरेगट आणि राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी उत्तर दिलं आहे.
राहुल शेवाळे यांच्यावर शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलेला मुंबईत आणण्यासाठी रुपाली पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहेत.
दाऊद आणि राष्ट्रवादी यांचा काहीही संबंध नाही. पण तरीही जर शेवाळे बेछूट आरोप करत असतील तर त्यांनी याबाबतचे पुरावे द्यावेत आणि मग बोलावं, असं आव्हान रुपाली पाटील यांनी दिलं आहे.
राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. माझं राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या महिलेने माझ्यावर आरोप केले आहेत. ती महिला पाकिस्तानी एजंटच्या मदतीने सगळं काही करत आहे. तिचा दाऊदशीही संबंध आहे. या महिलेला युवासेनेचा पाठिंबा आहे.राष्ट्रवादीचाही या प्रकरणात हात आहे, असं शेवाळे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. त्याला रुपाली पाटलांनी उत्तर दिलं.
राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा दाऊदशी संबंध नाही. पण जर शेवाळे तसा आरोप करत असतील तर शेवाळेंनी देशाच्या विरोधात काम केलं, असा त्यांच्या विधानाचा अर्थ घेत शेवाळेंवरच कारवाई व्हायला पाहिजे, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
राहुल शेवाळेजी, आदित्य ठाकरेंनी तुम्हाला विवाहबाह्य संबंध ठेवा, असं सांगितलं नव्हतं! आता प्रकरण थांबवण्यासाठी दाऊदचं नाव घेत आहेत. जर तुम्ही म्हणता त्या महिलेचे दाऊदशी संबंध आहेत, असं म्हणता तर मग तुम्ही तिच्याशी संबंध कसे काय ठेवले?, असा सवालही रुपाली पाटील यांनी शेवाळेंना केला आहे.