नेमकं काय केलं आव्हाडांनी? Video शहरभर स्क्रिन लावून दाखवणार, ऋता आव्हाड यांचा निर्धार काय?
महाराष्ट्रात सरकारतर्फे पोलिसांचा अशा रितीने गैरवापर सुरु असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनीही पत्रकार परिषदेत केलाय.
मुंबईः जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांच्याविरोधात विनयभंग झाल्याची तक्रार भाजपाच्या महिला (BJP leader) पदाधिकाऱ्याने दिली आहे. मात्र गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे स्पर्श होणं हा विनयभंग आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येतोय. भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने सादर केलेला व्हिडिओच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येतोय. यात जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय केलंय? असा सवालही विचारण्यात येतोय. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाडदेखील (Ruta Awhad) आक्रमक झाल्या आहेत.
आव्हाड यांचा हाच व्हिडिओ आता शहरभर मोठ-मोठ्या स्क्रिन लावून दाखवण्यात येणार आहे. लोकांना कळलं पाहिजे, जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय केलंय? असा निश्चय जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी बोलून दाखवलाय. तसेच संबंधित भाजप महिला पदाधिकाऱ्याविरोधात ऋता आव्हाड यांनीही पोलीसात एक तक्रार दाखल केली आहे.
मुंब्रा येथील वाय ब्रीजच्या उद्घाटनाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्याठिकाणी जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. आव्हाड यांनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर गर्दीतून वाट काढत जातानाचा हा व्हिडिओ आहे.
यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी रीदा राशीद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मला पकडून जितेंद्र आव्हाड यांनी बाजूला केल्याचा आरोप रीदा राशीद यांनी केलाय.
मागील चार दिवसात दोन खोटे गुन्हा दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यामुळे संतापून मी आमदारकीचा राजीनामा देतो, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी तसेच मविआ नेत्यांनी या घटनेवर तीव्र निषेध केलाय. जयंत पाटील, अजित पवार यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्रात सरकारतर्फे पोलिसांचा अशा रितीने गैरवापर सुरु असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केला.