मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) याच्यातील वादावर भाष्य करण्यात आलं आहे. हनुमान भक्तीचा दाखला देत रवी राणा यांच्या विधानाची पाठराखण करण्यात आली आहे. तर बच्चू कडू यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “रवी राणा (Ravi Rana) हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल?”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल. आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार?, असं म्हणत बच्चू कडूंवर टीका करण्यात आली आहे.
‘खोके’ आमदार म्हटल्यामुळे आपली अप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे आपण खोके घेतल्याचे पुरावे द्या, नाही तर परिणामांना सामोरे जा, असा दम कडू यांनी भरला. अर्थात राणा यांच्या दिलगिरीनंतर अमरावतीमधील सभेत त्याच राणांना कडू यांनी पहिली वेळ म्हणून माफीही दिली. म्हणजे आधी मोठय़ा आवेशात राणांचे बखोट धरले व नंतर ते सोडून दिले. तरी बच्चू कडू यांची वेदना समजून घेतली पाहिजे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.