“कोरोना नव्हे तर ऑक्सिजन तुटवड्याचे बळी! केंद्र सरकार काय प्रायश्चित्त घेणार?”, सामनातून सवाल
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून कोरोना महामारीच्या काळात झालेल्या मृत्यूबाबत लिहिण्यात आलं आहे.
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) कोरोना महामारीच्या काळात झालेल्या मृत्यूबाबत लिहिण्यात आलं आहे. कोरोना नव्हे तर ऑक्सिजन तुटवड्याचे बळी असल्याचं म्हणण्यात आलं आहे. “केंद्राच्याच (Central Government) आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या स्थायी समितीने कोरोना काळात ऑक्सिजनच्या तुटवडय़ाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले, असा ठपका ठेवला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृतांच्या आकडेवारीचे ‘ऑडिट’ करून मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई द्यावी, अशीही शिफारस केली आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
“ऑक्सिजनअभावी झालेल्या कोरोना मृत्यूंबाबत डोळेझाक करणाऱ्या मोदी सरकारच्या डोळय़ांत समितीने झणझणीत अंजनच घातले आहे. त्याने तरी मोदी सरकारचे डोळे उघडतील का? ऑक्सिजनअभावी तडफडून मरण पावलेल्या हजारो कोरोना रुग्णांच्या वारसांच्या डोळय़ात गोठलेले अश्रू सरकारला दिसतील का? कोरोनाचे ‘ऑक्सिजन’ बळी हे वास्तव सरकार मान्य करेल का? आता सरकार म्हणून तुम्ही काय प्रायश्चित्त घेणार आहात?”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
ठाकरे सरकारच्या कोरोना व्यवस्थापनाचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केले होते. खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल कौतुक केले होते. राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू न झाल्याचा राज्य सरकारचा दावा वादग्रस्त ठरला नव्हता. इतर अनेक राज्यांत मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आणि कोरोना रुग्णांचे मरण हे दुर्दैवी समीकरण झाले होते, असं म्हणत कोरोना काळातील परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
मरण पावलेल्या हजारो कोरोना रुग्णांच्या वारसांच्या डोळय़ात गोठलेले अश्रू सरकारला दिसतील का? आजही त्यांचे न थांबलेले हुंदके ऐकू येतील का? कोरोनाचे ‘ऑक्सिजन’ बळी हे वास्तव सरकार मान्य करेल का? आता सरकार म्हणून तुम्ही काय प्रायश्चित्त घेणार आहात? समितीच्या अहवालाने असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. केंद्र सरकार त्यांची उत्तरे जनतेला देणार का?, असं सामनातून म्हण्यात आलं आहे.