“बावनकुळे 100% फडणवीसनिष्ठ! ‘त्या’ विधानाने ऐन थंडीत शिंदे गटाच्या पाठीला चटके, आगे-आगे देखो होता है क्या… “
सामनाच्या अग्रलेखातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर भाष्य करण्यात आलंय...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या विधानावर भाष्य करण्यात आलं आहे. “नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडावर बावनकुळे यांनी सांगितले की, ‘आमचे पुढील मुख्यमंत्री तुम्हीच’. याचा अर्थ स्पष्टच की , मिंधे सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढली जात आहे व फडणवीस वगैरे लोक सरकार व शिंद्यांच्या बाजूने लढत असल्याचा नुसता आव आणीत आहेत . बावनकुळे हे शंभर टक्के फडणवीसनिष्ठ आहेत व फडणवीस यांना हवी तीच भूमिका ते घेतात . मग इतके मोठे विधान फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय ते करतील काय ? हाच प्रश्न आहे . नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका बसला आहे . फेब्रुवारीपर्यंत बरेच काही घडेल “, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील औटघटकेची व्यवस्था डामाडौल आहे . बावनकुळे यांनी तसा फटाकाच फोडला आहे . भाजपच्या मनावरील दगड दूर करण्याचे काम सुरू झाले आहे !, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आहेत व राहतील, आम्ही सर्व शिंदेंच्या नेतृत्वाखाली ‘उप’ म्हणून काम करू.’ हे फडणवीस यांचे विधान व त्यांच्या प्रांताध्यक्षांचे विधान यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. श्री. फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात काय खळबळ आहे ते हे बावनकुळेंनी स्पष्ट केले, असं म्हणत सामनातून बावनकुळे यांच्या विधानावर भाष्य करण्यात आलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या मनातली वेदना अचानक उसळून ओठावर येते. ‘मी प्रदेश अध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत,’ अशी इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
बावनकुळे हे श्री. फडणवीस पुरस्कृत पक्षाध्यक्ष आहेत. दुसरे असे की, इतके मोठे विधान बावनकुळे स्वतःच्या मनमर्जीने करणार नाहीत. त्यामुळे फडणवीस यांच्या मनातली इच्छा बावनकुळेंच्या मुखातून बाहेर पडली असे मानायला जागा आहे, असंही सामनात म्हणण्यात आला आहे.