“जनता गोवरने त्रस्त तर मिंधे गटाचे आमदार खोक्यांच्या शय्येवर!”, सामनातून शिंदे सरकारवर निशाणा
सामनातून राज्य सरकारवर निशाणा
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून गोवर आजारावरून शिंदे सरकारवर (Eknath Shinde) टीका करण्यात आली आहे. “कोरोना संकटकाळात राज्यात ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर होते व सतत दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते, मार्गदर्शन करीत होते.आज ते चित्र नाही. आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
“मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत. चीनमध्ये कोरोना लॉक डाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले! अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे?”, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
“गोवरसंदर्भात मार्गदर्शक नियमावली महाराष्ट्र राज्यासाठी जारी केली गेली. त्या नियमावलीचा अभ्यास सर्वप्रथम राज्याच्या खोकेबाज आरोग्यमंत्र्यांनी करायला हवा. महाराष्ट्राच्या नशिबी या संकटकाळात एक बेजबाबदार व उठवळ आरोग्यमंत्री आला. त्यास परिस्थितीचे गांभीर्य माहीत नाही. त्यामुळे संकटाची तीव्रता जास्त आहे”, असं म्हणत तानाजी सावंत यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
आज मोदी व संपूर्ण सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगलंय आणि गुंतलंय! त्यांचे सर्व राजकीय हल्ले सुरू आहेत ते काँगेस आणि राहुल गांधींवर. आजही त्यांना राहुल गांधी हेच त्यांच्यासमोरील ‘संकट’ वाटत आहे. देशासमोरील इतर सर्व संकटे गौण ठरवून गुजरात निवडणूक जिंकणे हीच त्यांची ईर्षा दिसते, पण चीनच्या सीमेवर कोरोनाचे संकट पुन्हा उभे आहे व ते केव्हाही वावटळीसारखे आपल्याकडे घुसू शकते, असं म्हणत केंद्र सरकारवरही निशाणा साधण्यात आला आहे.