गोपीचंद महाशयांचे घाणेरडे वक्तव्य फडणवीस किंवा भाजपची ‘मन की बात’ नाही ना? : सामना
गोपीचंद हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे (Saamana Editorial on Gopichand Padalkar Remark on Sharad Pawar)
मुंबई : “गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना” अशी शंका ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचा ‘सामना’तून समाचार घेण्यात आला. बिहार निवडणुका जवळ आल्याने ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवल्याचे अधोरेखित करुन सैन्य दलातील जात, प्रांत यास महत्व आणले जात आहे, असा घणाघातही अग्रलेखातून करण्यात आला आहे. (Saamana Editorial on Gopichand Padalkar Remark on Sharad Pawar)
काय आहे ‘सामना’चा अग्रलेख?
“गोपीचंद जासूस नावाचा हिंदी सिनेमा पूर्वी येऊन गेला. भाजपने राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला असून त्याच्या करामतींमुळे भाजपला गावागावात चपलांचा प्रसाद खाण्याची वेळ आली आहे. एकनाथ खडसे यांना मागे ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना आमदार केले त्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर फार घाणेरड्या शब्दात भडास व्यक्त केली. गोपीचंद हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे.” असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
“पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह नाहीत हा गोपीचंद यांचा आक्षेप. यात पवारांचा संबंध येतोच कुठे? हा फैसला फडणवीस सरकारने करायचा होता. 2014 मध्ये फडणवीस सरकार आलेच होते आणि धनगर आरक्षणाचा ठराव पहिल्याच कॅबिनेटमध्ये करु असे वचन भाजपचेच होते, हे गोपीचंद कसे विसरले? पवारांनी बहुजन समाजातील अनेक तरुणांना राजकारणात पुढे आणले नसते तर दिवंगत आर आर पाटील तसेच जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे ही नावे राजकारणात दिसली नसती.” असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती, त्यांना जशास तसं उत्तर देऊ : निलेश राणे
“लडाखमधील गलवान खोऱ्यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले. देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले. पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील जात, प्रांत यास महत्व आणले जात आहे. हे असे राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे, महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली. हे सुधारणार कधी तेच कळत नाही.” अशी टीकाही करण्यात आली आहे.
VIDEO : Gopichand Padalkar | पवारांचा अनादर करण्याचा पडळकरांचा कुठलाही हेतू नव्हता : चंद्रकांत पाटीलhttps://t.co/vf00tqOhEm
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2020
(Saamana Editorial on Gopichand Padalkar Remark on Sharad Pawar)