“RSS सावरकरांचा कठोर टीकाकार, आता भाजपचं प्रेम हे राजकीय स्वार्थासाठी!”
सामनातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर सावरकरांच्या मुद्द्यावरून टीका, वाचा...
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळ ढवळून निघायलंय. अशात आजच्या सामनातून (Saamana Editorial) भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर सावरकरांच्या मुद्द्यावरून टीका करण्यात आली आहे.”वीर सावरकरांवर नाहक टीका करून राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. ‘भारत जोडो’ यात्रेचा तो अजेंडा नव्हता. भारतीय जनता पक्ष सावरकरांच्या अपमानाविरुद्ध रस्त्यावर उतरला. सावरकरप्रेमाचे हे ढोंगच म्हणावे लागेल. संघ सावरकरांचा कठोर टीकाकार राहिला, पण आज राजकीय स्वार्थासाठी भाजप सावरकरवादी झाला. सावरकरांनी (Vinayak Savarkar) 10 वर्षे अंदमानच्या काळय़ा पाण्यावर नरकयातना भोगल्या. त्या देशासाठीच होत्या याचा विसर पडू नये!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
वर्षांपेक्षा जास्त काळ अंदमानात नरकयातना (देशासाठी) भोगल्यावर सावरकरांनी ‘डावपेच’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल तर त्यास शरणागती-माफीनामा म्हणता येणार नाही. आज ‘ईडी’सारख्या स्वतंत्र हिंदुस्थानातील तपास यंत्रणांच्या भयाने भले भले एका रात्रीत ‘स्वदेशी’ सरकारला शरण जातात. पक्ष बदलतात. स्वतःच्या निष्ठा विलीन करतात. सावरकरांनी दशकभर अंदमानात ज्या यातना सहन केल्या त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी. आठ वर्षांपासून भाजपचे राज्य केंद्रात आहे, पण सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करून माफीचा डाग धुऊन काढावा असे ढोंगी सावरकर भक्तांना वाटत नाही, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
वीर सावरकरांचे क्रांतिकार्य महान होते, पण आज भाजपास सावरकरप्रेमाचा जो उमाळा आलाय ते सरळ सरळ ढोंग आहे. पंतप्रधान मोदी नेहरूंच्या बदनामीची भूमिका सोडत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांना त्याच कारणासाठी पकडले, हा देशाचा अजेंडा नाही. अशाने भारत कसा जोडणार?, असा सवालही आजच्या सामनातून विचारण्यात आला आहे.