मुंबई : “बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिले आहे. सत्तेवर राहूनही इतक्या वर्षांनंतर ही वेळ यावी हे बिहारच्या जनतेचे दुर्दैवच आहे. नोकरीसाठी बिहारचे मजूर महाराष्ट्रात आणि प्रचारासाठी हैदराबादचे झगमगीत रस्ते बिहारात,” असा टोला शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लगावला आहे. (Shivsena Criticism Bihar CM Nitish Kumar)
“एक झगमगाट करणाऱ्या ‘स्ट्रीट लाइट’ने उजळून निघालेल्या फ्लायओव्हरचा फोटो सुरेश कुमार शर्मा यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला शीर्षक दिले, ‘मुझफ्फरपूर स्ट्रीट लाइट योजना.’ आता जागरुक मतदारही कामास लागले आणि हा भव्य सुंदर प्रकाशमान रस्ता शोधू लागले. तेव्हा संपूर्ण मुझफ्फरपूर पालथे घातले तरीही मंत्र्यांनी ‘टाकलेला’ या फोटोतील रस्ता मिळाला नाही. कारण नितीशकुमारांच्या मंत्र्यांनी ‘स्वतःचे कार्य’ म्हणून टाकलेला हा फोटो प्रत्यक्षात हैदराबादमधील रस्त्याचा होता. तर बिहारच्या विकासाचा खरा चेहरा हा असा आहे!,” असा चिमटाही शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून नितीशकुमारांना काढला आहे.
“बिहारच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, यावर आतापासूनच पैजा लागल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे बिहारात बारा सभा घेतील, असे जाहीर केले आहे. गृहमंत्री अमित शाहादेखील प्रदीर्घ काळानंतर कामावर परतले आहेत. भाजपला बिहारात सर्वाधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील. नितीशकुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. इथे एक दुरुस्ती करणे गरजेचे आहे. नितीशकुमार हे जुने आणि भरवशाचे सहकारी आहेत हे विधान तर्कसंगत नाही,” असे अमित शाहांनी स्पष्ट केले.
“आताही अमित शहा यांना जाहीर करावे लागले की, आम्ही जास्त जागा जिंकल्या तरी मुख्यमंत्री नितीशबाबूच! नितीशबाबू हा एकच चेहरा बिहारात आहे, असे सगळ्यांनी ठरवूनच टाकले आहे. पण ‘सर्वाधिक जागा मिळाल्या तरी…’ हे बिहारचे सूत्र भाजपने महाराष्ट्र किंवा इतरत्र वापरले नाही,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला. (Shivsena Criticism Bihar CM Nitish Kumar)
“नितीशकुमार ‘एनडीए’त जाऊन येऊन राहिले. तरी ते निष्ठावान, जुने सहकारी ठरतात. त्याबद्दल नितीशकुमारांच्या कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? ते रहस्यच आहे. बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय?” असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
“सुशांतसिंह राजपूतच्या नावावर मते मागणे सुरूच आहे. आता हे इतर राज्यांतील विकास कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचे भुरटे-भामटे उद्योगही नव्या दमाने सुरूच आहेत. बिहारमध्ये कुपोषण, भूक, रोजगाराचा प्रश्न आगडोंबासारखा उसळला आहे. आमचे बिहारी मजूर इतर राज्यांत जातात म्हणून त्या त्या राज्यांचा विकास होतो वगैरे बोलणे ठीक आहे हो, पण हे मजूर बिहार सोडून परराज्यांत जातात ते पोटाची आग विझवण्यासाठी. जे मजूर इतर राज्यांत जाऊन विकास शिल्प घडवतात त्याच श्रमणाऱ्या हातांच्या ताकदीवर नवा बिहार, विकासाच्या मार्गावरील बिहार का घडवता आला नाही?” असा प्रश्नही सामनातून विचारण्यात आला आहे.
“खरोखरच या श्रमिकांच्या हातांना त्यांच्याच राज्यात काम मिळाले असते तर हैदराबादच्या रस्त्यांचे झगमगणारे फोटो ‘आपलेच’ म्हणून ढोल पिटण्याची नामुष्की आली नसती. सत्तेवर राहूनही इतक्या वर्षांनंतर ही वेळ यावी हे बिहारच्या जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. नोकरीसाठी बिहारचे मजूर महाराष्ट्रात आणि प्रचारासाठी हैदराबादचे झगमगीत रस्ते बिहारात. याच रस्त्यांवर बहुधा ‘भाजप-जदयु’ची संयुक्त प्रचार सभा होईल असे दिसते. नितीशकुमार हे भाजपचे भरवशाचे जुने साथी असल्याने त्यांच्याविषयी जास्त न बोलणेच योग्य!,” असे शिवसेनेनं म्हटलं. (Shivsena Criticism on Bihar CM Nitish Kumar)
संबंधित बातम्या :
थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा