Arnab Goswami : मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष जगातले आठवे आश्चर्य; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रातील सत्ताधारी आणि महाराष्ट्रात विरोधी खुर्चीत बसलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते अर्णव गोस्वामी यांच्या अटकेपासून सातत्याने राज्य सरकारवर टीका करत आहेत, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करत आहेत. यावरुन राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेने ‘सामना’ (Saamana) या त्यांच्या मुखपत्रातील अग्रलेखाद्वारे भाजपवर पलटवार केला आहे.
अग्रलेखात म्हटलं आहे की, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही. ही ‘ट्रम्प’ संस्कृती हिंदुस्थानात कोणी रुजवत असेल तर त्यांनी अमेरिकेत सुरू झालेल्या अराजकाकडे डोळसपणे पाहायला हवे. तसे अराजक कोणाला हिंदुस्थानात हवे आहे काय? राजकारणात देशाचे वाटोळे होऊ नये, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा सदोष मनुष्यवध घडू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा. मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे!
आत्महत्येस प्रवृत्त करणे व त्यातून आत्महत्या घडणे हा एक प्रकारे सदोष मनुष्यवधासारखाच गुन्हा आहे. असा गुन्हा करणारी व्यक्ती लहान असो की मोठी, त्याच्यावर कायद्याने कारवाई व्हायलाच हवी, पण भारतीय जनता पक्षाला असे कायद्याचे राज्य मान्य नाही मुळात त्यांना कायदाच मान्य नाही असे भरकटलेले वर्तन ते करीत आहेत. महाराष्ट्रात 2018 साली एका माय-लेकरांनी आत्महत्या केली. तत्कालीन सरकारने ते प्रकरण दडपले. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीस पकडले व त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना भाजपचे पुढारी वेडेखुळेच बनले. ते म्हणतात, जोपर्यंत सदोष मनुष्यवधातले ‘महात्मा’ सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे दंडास काळय़ा फिती लावून काम करू. हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे. नशीब की, याप्रश्नी भाजपने राज्यव्यापी जेल भरो, साखळी उपोषणे यांसारखे प्रयोग सुरू केलेले नाहीत. मनाने भरकटलेले प्रे. ट्रम्प अमेरिकेत जसे वागत आहेत तसेच ‘डिट्टो’ महाराष्ट्रातील भाजप पुढारी वागू लागले आहेत.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होताना दिसत आहेत, पण ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बसून दादागिरीची भाषा सुरू केली आहे. तद्दन खोट्या बातम्या पसरवून पदाची नाचक्की करत आहेत. कधी मतमोजणी थांबवा असा त्यांचा कांगावा असतो, तर कधी न्यायालयात जाऊन निर्णयास स्थगिती देण्याची मागणी करीत आहेत. ट्रम्प यांनीही त्यांच्या सशस्त्र ‘रिपब्लिकन’ समर्थकांना रस्त्यांवर उतरवून गोंधळ आणि हिंसाचार सुरू केला आहे. ट्रम्प यांचे जे वर्तन आहे ते कायद्यास व अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या प्रतिष्ठेस धरून नाही. तशीच अप्रतिष्ठा महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून कायद्याच्या बाबतीत सुरू आहे.
आणीबाणीसारखी परिस्थिती कोण निर्माण करीत आहेत आणि अराजक कुणाला हवे आहे ते आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेचे आणि प्रतिष्ठेचे भंजन करण्याचे हे कारस्थान दिसत आहे. मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या संशयित आरोपीचा निकाल रस्त्यावर उतरून कसा काय होऊ शकतो? गुजरातमध्ये गोध्राकांड व इतर प्रकरणांत अमित शहांपासून अनेक भाजप नेत्यांना तत्कालीन सरकारच्या कारवाईस सामोरे जावे लागले. या सर्व कारवाया सूडाच्याच होत्या असे शहा यांचे म्हणणे असले तरी त्यासाठी भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलने केली नाहीत व कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही. न्यायालयीन डावपेचातून श्री. शहा सुटले आहेत. तेव्हा तर श्रीमान मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी तेव्हा संयम राखला, त्याचे फळ त्यांना मिळाले.
सदोष मनुष्यवधप्रकरणी सरकारवर, ज्यांचा मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर अश्लाघ्य चिखलफेक करणाऱ्या टोळ्यांनी याचे भान राखले नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्या बाबतीत घडले त्याची पुनरावृत्ती हिंदुस्थानात घडायला वेळ लागणार नाही. भाजपवाल्यांचे डोके इतके कामातून गेले आहे की, दिल्लीच्या रस्त्यांवर श्री. उद्धव ठाकरे व इंदिरा गांधी यांची पोस्टर्स चिकटवून आणीबाणीची आठवण लोकांना करून दिली जात आहे. हा बालिशपणा तर आहेच, पण अज्ञानसुद्धा आहे. इंदिरा गांधींशी तुलना होणे ही गौरवाचीच बाब आहे. ‘हिंदुस्थान’च्या फाळणीचा सूड याच पोलादी स्त्रीने पाकिस्तानची फाळणी करून घेतला. असे धाडस पाकिस्तानच्या बाबतीत एकाही ‘मर्द’ म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यास दाखवता आले नाही. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव जरूर झाला, पण त्याच इंदिरा गांधींना देशाच्या जनतेने पुन्हा विजयी केले. देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजींनी शेवटी प्राणाचे बलिदान दिले. असा दुर्दम्य त्याग नंतर एखाद्या तरी पंतप्रधानाने केला असेल तर दाखवा. त्यामुळे भाजपने दिल्लीच्या रस्त्यावर इंदिराजी व उद्धव ठाकरे यांचे एकत्र चेहरे लावले असतील तर त्याचे स्वागत आहे. यानिमित्ताने त्यांनी पाळण्यात बसून पुन्हा इतिहासाचे वाचन केले तर बरे होईल. म्हणजे सदोष मनुष्यवध प्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ दंडास काळ्या पट्ट्या आणि पायांत गुलामीचे घुंगरू बांधून नाचायची वेळ येणार नाही.
पंतप्रधान, राष्ट्रपती, लष्करप्रमुख, राज्यपाल अशा पदांवरील व्यक्तींचा एकेरी आणि ‘अरे-तुरे’च्या भाषेत जाहीर उद्धार केलेला भाजपला चालणार असेल तर त्यांनी तसे सांगावे. म्हणजे त्यांच्या दंडावरील काळ्या पट्ट्यांचे आम्हीही स्वागत करू. अमित शहा, मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही. ही ‘ट्रम्प’ संस्कृती हिंदुस्थानात कोणी रुजवत असेल तर त्यांनी अमेरिकेत सुरू झालेल्या अराजकाकडे डोळसपणे पाहायला हवे. तसे अराजक कोणाला हिंदुस्थानात हवे आहे काय? राजकारणात देशाचे वाटोळे होऊ नये, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा सदोष मनुष्यवध घडू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा. मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे!
संबंधित बातम्या
Arnab Goswami Case Live | अर्णव गोस्वामींना आजही दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी
अर्णव गोस्वामींची सुटका आणि पोलिसांचं निलंबन करा, राम कदम यांचं उपोषण
(Saamna Editorial : ShivSena slams BJP over protest for Arnab goswami)