“आपण रस्त्यावरची लढाई लढू, पण राजीनामा देऊ नका”, जितेंद्र आव्हाड यांना विनंती
आमदारकीचा राजीनामा देऊ नये, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांना करण्यात आली आहे.
मुंबई : आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांनी केलं. त्यानंतर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. आपण रस्त्यावरची लढाई लढूया. पण तुम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ नका, अशी विनंती आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे.
आव्हाडांचा राजीनाम्याचा निर्णय
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ?३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
खरात काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाडजी, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला संसदीय आणि रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊ नका, अशी विनंती सचिन खरात यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू,आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्यासाठी काम करत आहेत तसेच या राज्यामध्ये गोळवळकर आणि हेडगेवार यांच्या विचारला सातत्याने विरोध करत आहेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेला चांगलेच माहित आहे. म्हणूनच आज आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे.हे अत्यंत निंदनीय आहे, असं खरात म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड यांना आम्ही सांगू इच्छितो की, राज्यामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट आलेले आहेत. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला आहे. याच्याबद्दल आपण आवाज उठवत आहात, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडजी आपल्याला लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी संसदीय आणि रस्त्यावरची सुधार लढाई लढावी लागेल. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड आपण आमदारकीचा राजीनामा देऊ नका, असंही खरात यांनी म्हटलं आहे.